Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डमी परीक्षार्थी प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 9 दिवसांची पोलीस कोठडी

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) बहुचर्चित बनावट परिक्षार्थी घोटाळा प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने काल सहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक केली. त्यास आज किनवट न्यायालयाने 9 दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे. या सहायक पोलीस निरीक्षकाने अनेक विद्यार्थ्यांसाठी बनावट विद्यार्थी बणून त्यांच्या परीक्षा दिल्या त्यात अनेक विद्यार्थी पास झाले आहेत.. चौकशीत अनेक खळबळजनक गोष्टी समोर येतील, अशी माहिती सीआयडीचे पोलीस अधिक्षक शंकर केंगार यांनी दिली.

डमी परीक्षार्थी प्रकरणात दि.21 मे रोजी मांडवी जिल्हा परिषद गटाचे सदस्य मधुकर बाबाराव राठोड यांचा मुलगा प्रबोध राठोड यास राज्य गुप्तचर विभागाने मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्याच्या जबानीनुसार दुसरा आरोपी म्हणून दि.29 मे रोजी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील सहाय्यक कक्ष अधिकारी अरविंद टाकळकर याला राज्य गुप्तचर विभागाच्या पथकाने जालन्यात अटक केली. या प्रकरणाचे जाळे संपूर्ण राज्यात पसरलेले असल्याने तपास गतीमान करून यातील दोषी आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू होते. या मोहिमेअंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, काटोल, नागपूर ग्रामीण येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सोमनाथ अभंगराव पारवे पाटील (वय 33 वर्षे) यांना काल रात्री (दि.8) लातूर येथे अटक करण्यात आली. ते वाचक या पदावर कार्यरत आहेत. ते मूळचे लोदगा (ता.औसा,जि.लातूर) येथील मूळ रहिवासी आहेत. गुप्तचर पोलीस विभागाच्या पथकाने त्यांना आज बुधवारी (दि.9) किनवट न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यांना नऊ दिवसाची अर्थात दि.18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जवळपास 13 ते 15 वेळा त्यांनी इतर विद्यार्थ्यांऐवजी डमी परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलीस कोठडीतील तपासातून अनेक खळबळजनक बाबी स्पष्ट होतील, असा अंदाज पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला.


सीआयडीचे पोलीस अधिक्षक शंकर केंगार, पोलीस निरीक्षक यु.आर.थिटे, आर.आर.सांगळे, पोहेकॉ. एन.यु.पवार, पोहेकॉ.एस.डी.वाठोडे, वाहन चालक पोलीस कर्मचारी शैलेश काटकळंबेकर आदींचा समावेश असलेल्या पथकाने त्यास अटक करून कोर्टात सादर केले होते. यावेळी सरकारी वकील व्ही.डी.चव्हाण, पोहेकॉ.उकंडराव राठोड हे यावेळी उपस्थित होते. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले योगेश मोतीराम पंचवटकर हे शासकीय दस्तऐवज परीक्षक म्हणून औरंगाबाद येथे कार्यरत आहेत; तर दुसरे सहभागी आरोपी भगवान उत्तम झम्पलवाड हे नांदेड येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक झालेली आहे. त्यापैकी एकास जामीन मिळाल्याने उर्वरीत तीन आरोपी तुरुंगात आहेत. या प्रकरणात परीक्षार्थींच्या नावावर डमी विद्यार्थी बसवून नोकरी मिळवून देण्याचा प्रकार 2015 पासून सुरू होता. नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर लाभार्थ्यांकडून साडेतीन ते 20 लाखापर्यंत रक्कम घेतल्या जात होती. ही बाब तपास अधिकाऱ्यांच्या तपासणीतून पुढे आली.

मांडवी येथील योगेश जाधव या विद्यार्थ्याने पाठपुरावा करत या प्रकरणाचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सी.आय.डी.) कडे सोपविण्यात आला होता. राज्य गुप्तचर विभागाचे अपर  पोलीस महासंचालक संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद विभागाचे पोलीस अधिक्षक शंकर केंगार हे या प्रकरणात तपास करीत आहेत. प्राथमिकतः हा तपास नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत वेगळा विभाग असलेल्या आर्थिक गुन्हा शाखेकडे होता. तेथे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश दिगंबर सोनसकर कार्यरत होते. तपास करताना तक्रारीचा तपास करण्याऐवजी  आरोपी प्रबोध राठोडला मदत होईल यासाठी प्रयत्न केल्याने ते सुध्दा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या यादीत अटक होण्याच्या मार्गावर आहेत. मागील दोन महिन्यांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग दिनेश सोनसकरचा शोध घेत आहे पण ते सापडत नाहीत. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बनावट विद्यार्थी प्रकरणात अजूनही बरेच अधिकारी आणि इतर लोक आरोपी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या