Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे नामकरण आता छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा

मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे दि. २७ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे नाव राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धा असे करण्यात आले होते. मात्र, जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करुन
स्पर्धेच्या नावात अंशत: बदल करण्याची मागणी केली होती. ती मान्य करुन आता या स्पर्धेचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा असे करण्यात आले आहे. 


यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय दिनांक २१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. कर्जत (जि.अहमदनगर) येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून पालकमंत्री प्रा.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा नियोजनाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट व्हावी, यासाठी सर्वपातळीवर तयारीला सुरुवात झाली असून नुकताच प्रा.शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचे मैदान तयार करण्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला आहे.

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या समोरच्या बाजूस असणाऱ्या मोकळ्या पटांगणावर २५ हजार प्रेक्षक बसू शकतील असे क्रीडांगण तयार करण्यात येणार असून खेळासाठी ४ मैदाने असणार आहेत. कर्जत सारख्या तालुक्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे, ही मोठी गोष्ट असून त्यामुळे शिस्त, नियोजन आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी १६ संघ यात सहभागी होणार आहेत. २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत स्पर्धेची सांघिक व बाद फेरी होणार असून दिनांक १ जानेवारी रोजी स्पर्धेचे दोन्ही गटातील अंतिम सामने होतील, अशी माहिती प्रा.शिंदे यांनी दिली. क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि स्थानिक आयोजन समितीच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या