Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संतप्त बापाने घराशेजारी महिलेचा गळा चिरुन केली हत्या - NNL

कन्येच्या प्रेमविवाह करण्यास कारणीभूत असल्याचा राग मनात होता  किनवट/ईस्लापूर| कन्येच्या प्रेम विवाहास कारणीभुत असल्याचा राग मनात धरुन सुरेश धनसिंग राठोड यांनी कोयत्याने शेजारील बेबीबाई भिमराव चव्हाण या महिलेचा गळा चिरुन हत्या केली आहे. हि घटना दि.३१ सोमवार रोजी पहाटे १० वाजेच्या सुमारास बुरकूलवाडी ता. किनवट येथे घटना घडली आहे. महिलेचा हत्या करुन मारेकरी हत्यारासह ईस्लापूर पोलिस ठाण्यात हजर होऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, ईस्लापूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बुरकूलवाडी ता. किनवट येथील बेबीबाई भिमराव चव्हाण वय ४० या महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या सुरेश धनसिंग राठोड वय ५० यांची मोठी मुलगी हिचा गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळाल्याने सहा महिन्यापूर्वी दोघांचा विवाह लाऊन देण्यात आला होता. पण ही बाब मुलीचे वडील सुरेश धनसिंग राठोड यांना मान्य नव्हती. त्यामुळे तो नाराज होता. या कारणावरुन मुलांच्या नातेवाईकाशी वाद घालत असे. ही बाब त्याच्या मनात सतत सलत असल्याने. या कारणावरुन बेबीबाई या महिलेस तुच माझ्या मुलीचा प्रेम विवाह लाउन दिलास. हे सर्व कारस्थान तुझे आहे. तुला मी सोडणार नाही. तुला मी कधी ना कधी तरी बघून घेतो असे बेबीबाईस सहा महिण्यापासुन धमकी देत होता असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

सोमवारी सकाळी बेबीबाई ही महिला अंगणातील जनावराचा गोठा साफ करत असतांना अचानक माझ्या आईचा किंचाळण्याचा आवाज आल्याने घराबाहेर आलो असता. माझी आई अंगणात रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली दिसली. पळत जाऊन पाहिले असता. माझ्या आईच्या गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्याने ती जागीच मरण पावली होती. त्यावेळी माझा लहान भाऊ अक्षय यांनी सांगितले की. सुरेश धनसिंग राठोड हा त्याच्या हातात रक्ताने भरलेला लोखंडी कोयता घेऊन पळून जाताना पाहिले. असा जवाब मयताचा मुलगा मनोज भिमराव चव्हाण यांनी दिला आहे.

सदर घटनेनंतर आरोपी सुरेश धनसिंग राठोड हा रक्ताने भरलेला कोयता घेऊन ईस्लापूर पोलिस ठाण्यात स्वत: च हजर झाला. या ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, पोलिस उपनिरीक्षक योगेश बोधने यांनी आरोपीस ताब्यात घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन ईस्लापूर पोलिसांना मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या