Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्यांनी शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासली - कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी - NNL


नांदेड|
पदवी घेतली म्हणजे शिक्षण पूर्ण झाले असे नाही, तर ती पदवी आपण ज्या समाजामध्ये, ज्या विद्यापीठांमध्ये, ज्या देशांमध्ये घेतली. त्याचे आपण काही देणे लागतो, ही सजग भावना सतत मनात विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. तरच समाज घडेल, विद्यापीठाची प्रतिमा उंचावेल आणि एक विकसित देश घडेल म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे मत विद्यापीठाचे कुलपती तथा राज्याचे मा.राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ते आज मंगळवार, दि.०४ मे रोजी दूरदृष्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मुंबई येथून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत आणि मुंबई येथील टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. एस.रामकृष्णन हे उपस्थित होते. तर यावेळी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत वक्ते,  वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.पंचशील एकंबेकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील आणि कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने या महामारीच्या काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या संकटाच्या काळात त्यांनी संधी समजून काम केले आहे. कोव्हीड सारख्या भयानक आजारावर लॅब तयार करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आणि समाजउपयोगी कार्य करण्याचे काम विद्यापीठाचे आहे, हा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

यावेळी उन्हाळी-२०२० परीक्षेत विविध विषयांमध्ये सर्वप्रथम आलेल्या ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक जाहीर केले. याशिवाय ३९० पदविका, १७९१ पदवी, ४५५१ पदव्युत्तर आणि २५१ पीएच.डी.पदवीधारक असे एकूण २२२८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पीएच.डी. विद्यार्थी, विद्यापीठ परिसर, उप-परिसर, न्यु मॉडेल डिग्री कॉलेजच्या ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांना लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष पदवी देण्यात येणार आहे. तर तेविसाव्या  दीक्षान्त  समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आवेदन पत्र सादर केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र त्यांच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पदवी वितरण कार्यक्रमामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत.

यावेळी मुंबई येथून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत उपस्थितांना मार्गदर्शन करातांना म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कार्य अद्वितीय आहे. शैक्षणिक उपक्रमासोबतच इतरही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे हे विद्यापीठ आहे. हरितक्रांती, कोव्हीड लॅब यासारखे सामाजिक बांधिलकीतून निर्माण केलेले उपक्रम हे खरोखर कौतुकास्पद आहेत. विद्यापीठाने शासकीय बी.एड्. कॉलेजला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ परिसरामध्ये असे अनेक शैक्षणिक हब निर्माण झाले पाहिजेत. पाश्चिमात्य देशांमध्ये एका विद्यापीठाच्या परिसरामध्ये अनेक शैक्षणिक धोरणे राबविण्यात येतात आणि शैक्षणिक संकुलाद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तहान भागविली जाते. याच धर्तीवर आपल्याकडील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे.

मुंबई येथील टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. एस.रामकृष्णन आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, आज जे पदवीधर होत आहेत त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. एक असे विद्यापीठ जे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने आहे. आज पदवीधर स्नातक म्हणून मी तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ यांना अनुसरण्याचे आहे, त्यांच्या जीवनातून काही मुल्य अंगीकारण्याची विनंती करतो. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. केवळ पदवी संपादन करण्यासाठी शिक्षण नाही तर विविध प्रकारची जीवन कौशल्य प्राप्त करण्यासाठी देखील आहे. 

आपल्या सभोवती अनेक प्रश्न आणि आव्हाने आहेत. त्यापैकी एका अथवा काही तुम्ही संधी म्हणून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे समाजाला आणि देशाला सहाय्यभुत ठरेल. शेवटी ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, विद्यार्थ्यांनी छंद जोपासावा. कुटुंब आणि मित्र यांच्याशी वैयक्तिक संबंध ठेवावेत. आयुष्याच्या ध्येय प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे. यासर्वांचे महत्त्व आपण या साथीच्या रोगात अनुभवलेच असेल. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या उपलब्धी बाबत वैशिष्ट्यपूर्ण आढावा सादर केला. पदवीधारक, सुवर्णपदक पारितोषिक प्राप्त आणि इतर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी योगदान द्यावे आणि विद्यापीठाला उत्कृष्ठतेच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सहाय्य करावी, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठ स्थापनेपासून पहिल्यांदाच दीक्षान्त समारंभ दूरदृष्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे आयोजित करण्यात आला होता. यासाठी विद्यापीठाच्या आय.टी. विभागाचे सिस्टीम एक्सपर्ट शिवलिंग पाटील, सुनील जाधव, अजय दर्शनकार, लीना कांबळे आणि संदीप टाकणखार यांनी यशस्वितेसाठी तांत्रिक सहाय्य केले.  

दीक्षान्त समारंभामध्ये सर्वप्रथम दीक्षान्त मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीत विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर दीक्षांत समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पृथ्वीराज तौर आणि डॉ.माधुरी देशपांडे यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यापरीषद यासह विविध प्राधिकरणावरील सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्यासह पालकांची ऑनलाइन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या