Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा, सरी तथा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करा -NNL

तालुका कृषि अधिकारी विजय चन्ना यांचे आवाहन हिमायतनगर, अनिल मादसवार| अवेळी पाऊस व पावसातील खंड यामुळे मागील काही वर्षांमध्ये सोयाबीन या पिकाची उत्पादकता सातत्याने घसरत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रुंद वरंबा व सरी तथा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करून पेरणी करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी विजय चन्ना यांनी केलं आहे.

ते शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून रुंद वरंबा व सरी तथा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्या संदर्भात मार्गदर्शन व हिमायतनगर तालुक्यातील दुधड परिसरात कृषी सहाय्यक सौ. स्वाती बेहेरे - ढगे यांच्या पुढाकारातून गावामध्ये गतवर्षी रुंद वरंबा व सरी पद्धतीने काही प्रमाणात सोयाबीनची लागवड केली गेली. यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.

या ठिकाणी सदरील शेतकऱ्यांना रुंद वरंबा व सरी तथा बीबीएफ या पद्धतीने दीड पटीने उत्पादन मिळत आहे. पण यावर्षी मात्र यात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी पीक प्रत्यक्षीक सोयाबीन + तुर साठी सोनारी गावाची निवड करण्यात आली असून, शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप करण्यात आल्या आहेत. यावेळी मंडळ कृषि अधिकारी गुणवंतराव टारपे, मधुकर सूर्यवशी, बालाजी माझळकर, सौ. स्वाती बेहेरे - ढगे यांची उपस्थिती होती. 

पीक कमी आणि जास्त पाऊस झाला तरी उत्पादनात घट होत नाही. या पद्धतीमुळे जास्तीचा पाऊस झाल्यास सरीवाटे पाण्याचा निचरा होऊन पीक नेहमी वापसा स्थितीमध्ये राहते. त्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास जमिनीमध्ये ओलावा टिकून राहून पिकांची जोमदार वाढ होते. चालू वर्षी सोयाबीनच्या बियाण्यांची वाढलेली किंमत व त्यासोबतच बियाणे टंचाई यावर मात करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केल्यास बियाण्यांमध्ये ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. उत्पादकतेमध्येही २५ ते ३० टक्के वाढ होते. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पिकाच्या शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकास भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती मिळाल्यामुळे शेंगा भरण्याचे प्रमाण, अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होते. फवारणीची कामे सोपी होतात असेही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संगितले.

बीबीएफ’ पद्धतीची वैशिष्ट्येसोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पावसामध्ये खंड पडल्यास निर्माण होणारी जमिनीतील पाण्याची कमतरता दूर करण्यास बीबीएफ पद्धत उपयुक्त ठरते. ‘बीबीएफ’ पद्धत पडणार्‍या पावसाचे पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरवून मातीत ओलावा जास्त काळ टिकवून ठेवते. पडणार्‍या पावसाच्या पाण्यास उताराच्या दिशेने वाहून जाण्यास अटकाव करते व जमिनीची धूप कमी करून जमिनीतील ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते.

बीबीएफ’ पद्धतीमुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आवश्यकतेपेक्षा जास्त झालेले पाणी सर्‍यांमधून वाहून नेले जाते व पीक पाण्यात डुंबून संपूर्ण नुकसान होण्यापासून बचाव होतो. या उलट, हे शेतातले पाणी शेतामध्येच मुरविल्यामुळे पावसाच्या दीर्घ खंडाच्या वेळी या जास्त झालेल्या पाण्याचा (ओलाव्याच्या स्वरुपात) पिकासाठी उपयोग होतो. या दोन्ही परिस्थितींवर ‘बीबीएफ’ने मात करता येऊन सोयाबीनचे जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकते.

रुंद वरंब्यावर सोयाबीनची लागवड केल्याने पाणी साचल्यामुळे होणार्‍या खोड व मूळ कुजव्या रेागांचा प्रादुर्भाव टाळला जातो. सोयाबीनची रुंद वरंब्यावर लागवड केली जाते, त्यामुळे सर्‍यांचा उपयोग करून आंतरमशागतीची कामे सुखकररीत्या करणे सोपे होते. पिकाला पाणी देणे, ठिबक संचाचा पाण्यासाठी वापर करणे, तण नियंत्रण, कीटकनाशक फवारणी इ. कामे योग्य रीतीने करणे शक्य होते. पिकामध्ये हवा खेळती राहते व सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो, त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत नाही.

बीबीएफ’चा सोयाबीन लागवडीसाठी अवलंब करण्यासाठी लक्षात घ्यावयाच्या बाबी 

1. उन्हाळी हंगामातील पिकाची काढणी किंवा कापणी होताच प्रत्येक वर्षी शक्य नसेल तर दोन वर्षांतून एकदा शेताची खोल नांगरणी करून घ्यावी, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली तापली जाईल.

2. मे महिन्यात तिसर्‍या आठवड्यात नांगरलेल्या शेताला कुळवाची एक पाळी द्यावी, तसेच प्रती एकरी 5 टन शेणखत शेतामध्ये सारख्या प्रमाणात विस्कटून द्यावे व कुळवाच्या दुसर्‍या पाळीने शेणखत शेतामध्ये मिसळून घ्यावे व शेताचे सारख्या प्रमाणात लेव्हलिंग (सपाटीकरण) करावे.

काय आहे पद्धत? 

साधारणत: 100-200 मि.मी. इतका पाऊस झाल्यानंतर जमीन वाफशावर असताना सोयाबीन-बीबीएफ सरी यंत्राने 150 सें.मी. रुंद वरंबे व 45 सें.मी. रुंद सर्‍या पाडून, रुंद वरंब्यावर चार ओळी (दोन ओळींतील अंतर 45 किंवा 60 सें. मी.) अशा प्रकारे सुधारित व जास्त उत्पादन देणार्‍या सोयाबीनच्या वाणांची पेरणी करावी. पेरणीच्या वेळी प्रती एकरी 4 पोते दाणेदार 200 किलो किंवा 20.20.00.13 50 किलो किंवा 18.46.00 DAP 50 किलोसोबत 10 किलो गंधक द्यावे. तसेच, सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता भरून काढण्यासाठी 10 किलो झिंक सल्फेट आणि 5 किलो फेरस सल्फेट द्यावे.

पेरणी चे अंतर - दोन ओळींतील अंतर (45 किंवा 60 सें.मी.) व दोन झाडांतील अंतर (7.5 किंवा 10 सें.मी.) पेरणी नंतर, बी उगवण्यापूर्वी पेरणी पूर्व तणनाशक 48 तासांच्या आत फवारावे.

सोयाबीन लागवडीसाठी ‘बीबीएफ’ यंत्र व त्याची वैशिष्ट्ये 

1.पेरणीची खोली आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची व्यवस्था या यंत्राला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

2.या यंत्राला पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर कमी जास्त करण्याची सोय करून देण्यात आली आहे.

3.हे बहुपयोगी यंत्र असून ते खरीप व रबी हंगामातील पिकांची आवश्यकतेनुसार सर्‍या पाडून पेरणी करण्यासाठी सहजासहजी वापरता येते.

4.या यंत्राद्वारे पाडलेल्या सर्‍यांमधून पिकाला आवश्यक तेव्हा पाणी देता येते.

5.या यंत्राद्वारे पेरलेले बियाणे लगेचच मातीमध्ये झाकले जाईल, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या