Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रचनात्मक पत्रकारितेला प्राधान्य द्यावे ... डॉ. विनय सहस्त्रबुद्धे -NNL

 "देवर्षि नारद पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा 2021"औरंगाबाद। देवगिरी विश्व संवाद केंद्रातर्फे आज दि. 6 जून 2021 रविवार रोजी देवर्षि नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण व अभिनंदन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अतिथी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष, इंडियन कॉउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स तथा राज्यसभा सदस्य) लाभले होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या उपाध्यक्षा डॉ. केजल भारसाखळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला या पुरस्काराच्या सन्माननीय विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली व त्यानुसार त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. प्रिंट मीडिया श्रेणीत श्री. संजय प्रभाकर देशमुख (जालना), इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत श्री जगदीश एकनाथ जयस्वाल (शहादा), ऑनलाईन न्यूज पोर्टल श्रेणीत श्री शेखर पाटील (जळगांव) व सोशल मीडिया मुक्त लेखन म्हणून श्री निलेश सुभाष वाणी (भुसावळ) यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या सर्व कार्यकर्ते तथा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. रा. स्व. संघ देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख श्री संतोष तिवारी, देवगिरी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न पाटील तसेच ऍड. रोहित सर्वज्ञ, श्री अमोल आंबेकर, श्री  चंद्रशेखर गौरशेटे, अभिषेक देशमुख, कल्पेश जोशी आदी सदस्यांच्या समन्वयाने आणि रा. स्व. संघ देवगिरी प्रांत सह सेवा प्रमुख स्वानंदजी झारे, अरुणजी समुद्रे व विभाकरजी कुरुंभट्टी यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. कोविड प्रादुर्भाव व शासनाच्या नियमांचे पालन करत ऑनलाईन व्यासपीठावर हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल आंबेकर, प्रास्ताविक संतोष तिवारी, अध्यक्षीय भाषण डॉ. केजल भारसाखळे तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर गौरशेटे यांनी पार पाडले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकारिता क्षेत्राच्या सद्य स्थितीवर प्रकाश टाकत वाचकांचा निर्भेळ वाचनाचा अधिकार तसेच समाजमाध्यमांची भूमिका याविषयात वस्तुस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, "निर्भेळ बातम्या वाचणं हा वाचकांचा अधिकार आहे, परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. जसे घडले तसे निर्भेळ स्वच्छ वार्तांकन झाले पाहिजे. माध्यमं ही जनजागरणाची प्रभावी साधन आहेत, परंतु पत्रकारिता क्षेत्रातील तंत्रज्ञान व काळानुसार होणारे बदल पाहता राजकारण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वार्तांकन हे केवळ सरकार विरोधी किंवा प्रस्थापितांच्या विरोधातच झाले पाहिजे असा पायंडा पडला आहे. त्याचप्रमाणे भडकावू, चमचमीत व खळबळ निर्माण करणाऱ्या बातम्यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. या क्रेझमुळे वार्ताहर निर्भेळ बातमी ऐवजी स्वतःच्या मनाचेही त्यात कंटेंट टाकू लागला. बातमीतील शब्दरचनेतून, विरामचिन्हातून, विशेषणातून राजकारण साधलं जाऊ लागलं, याचा जनमानसावर परिणाम होऊन माध्यमांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.

समाज माध्यमाविषयी बोलताना डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, "गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता समाज माध्यमं सुद्धा राजकारण करतात की काय असे वाटू लागले आहे. समाज माध्यमे ही व्यक्त होण्याची व्यासपीठ आहेत की आणखी काही हे स्पष्ट झाले पाहिजे. लोकांनी काय मांडायचं, काय नाही हे जर समाजमाध्यम ठरवत असतील, माध्यमांचा विशेषाधिकार वापरत असतील तर त्यांनाही माध्यमांना असलेल्या नियमांच्या चौकटीत आणावे का, याचा विचार झाला पाहिजे.

सकारात्मक वार्तांकन या विषयात बोलताना डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, "सकारात्मक वार्तांकन साठी देशभरात अनेक माध्यम चांगले उपक्रम राबवत असून त्यांना चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे. सरकारकडून जे काही चांगले कामे होतात त्याचेही वार्तांकन केले पाहिजे. संसदेत किंवा विधानभवनात गोंधळ होताना आपण बऱ्याचदा पाहत असतो. अश्या गोष्टी लोकशाहीची गरिमा मालिन करणाऱ्या असतात, पण तरीही घडतात. त्या थांबवयाच्या असतील तर पत्रकारांची व माध्यमांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. सदनात बोलणाऱ्या सदस्यांच्या भाषणाची दखल घेतली जावी म्हणून अनेक सदस्य चमकोगिरी करत नियम धाब्यावर बसवतात. आपली बातमी व्हावी व आपल्याकडे समाजाने आकर्षित व्हावे यासाठी ही धडपड असते. ही मानसिकता समजून घेऊन माध्यमांनी आपली भूमिका ओळखली पाहिजे असे त्यांनी सांगितले. पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन करत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

संतोषजी तिवारी यांनी प्रास्ताविक सादर करताना देवर्षि नारद पत्रकारिता पुरस्कार वितरणाचे हे सतरावे वर्ष असून 2005 सालापासून नियमितपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव केला जातो असे सांगितले. कोरोना महामारीच्या काळात पत्रकार बंधू भगिनींनी उल्लेखनीय कार्य केले असून समाजात घडणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक घडामोडींचा ताळमेळ साधून समाजहितासाठी पत्रकार व माध्यम मोलाची भूमिका निभावतात असे प्रतिपादन केले. डॉ. केजल भारसाखळे यांनी अध्यक्षीय भाषणात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले व विश्व संवाद केंद्राच्या माध्यमातून सकारात्मक विमर्श व संवादातील समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात त्याला समाजाकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो असे प्रतिपादन केले.  चंद्रशेखर गौरशेटे यांनी कार्यक्रमात उपस्थित सन्माननीय अतिथी, पत्रकार बंधू भगिनी, नागरिक यांचे आभार मानून वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा शेवट झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या