राज्याच्या सिमेवर असलेल्या गावातील विकासाला भक्कम मार्ग देऊ - पालकमंत्री अशोक चव्हाण-NNL

 देगलूर येथील शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण

नांदेड, अनिल मादसवार। तेलंगणा आणि कर्नाटकाच्या काठावर असलेल्या देगलूर तालुक्यातील खेड्यापर्यंत विकासाचे मार्ग पोहचावेत, त्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा हा व्यापक दृष्टिकोण महाविकास आघाडी शासनाने बाळगलेला आहे. या गावातील जनतेला अधिक चांगला न्याय देता आला पाहिजे ही आमची भूमिका आहे. यादृष्टिने सर्व विकास कामांचे नियोजन केले जात असून तब्बल 380 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांना उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.


देगलूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्ग 1 व वर्ग 2 अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले निवासस्थान व शासकीय विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बोटमोगरेकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, रामराव नाईक, महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


नांदेड येथून हैद्राबादकडे जाण्यासाठी आजच्या घडीला 5 तास लागतात. या अंतरात मोठे शहर व महत्वाचा टप्पा म्हणून देगलूरकडे पाहिले जाते. हे लक्षात घेता देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि मोठ्या स्वरुपातले विश्रामगृह व्हावे याबाबत नियोजन केले होते. यासाठी माजी आमदार स्व. रावसाहेब अंतापूरकर यांचाही आग्रह होता. देगलूरच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने युद्धपातळीवर लवकर पूर्ण करण्यात आले. 


आता या नवीन वास्तू तेवढ्याच अधिक स्वच्छ आणि चांगल्या ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्वच विश्रामगृहाबाबत अभ्यागतांना चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टिने व स्वच्छतासह योग्य ती निगा घेतली जावी या उद्देशाने खाजगी संस्थांना याची जबाबदारी देण्याबाबत धोरण ठरविले जात असल्याचे सूतोवाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.


देगलूर-बिलोली मतदारसंघातून नवनिर्वाचित झालेले आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे सर्वसमावेशक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आली आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी देगलूर-बिलोली तालुक्यासाठी सुमारे 350 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्वसामान्यांना या निधीतून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले. यावेळी महेश पाटील यांनीही समयोचित भाषणात विकासाबद्दल कटिबद्धता व्यक्त केली.


माजी खासदार खतगावकर जेंव्हा लेंडी प्रकल्पाचा गौरवपूर्ण उल्लेख करतात

देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्याला अधिक उजळ करण्यात लेंडी प्रकल्प हा अत्यंत महत्वाचा आहे. स्व. डॉ. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी ठेवून विचार केला. तीच भूमिका पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वेळोवेळी घेऊन या प्रकल्पाबद्दल आपली कटिबद्धता व भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या भवितव्याला योग्य दिशा देणारा हा प्रकल्प असून यात तब्बल 40 हजार एकर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. यातून शेतकऱ्यांची होणारी प्रगती ही अधिक महत्वाची आहे. यात जे काही पूर्नवसनाचे प्रश्न शिल्लक आहेत ते वित्त व जलसंपदा यांच्या सहमतीने तात्काळ मार्गी लागतील, असा विश्वास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पालकमंत्र्यांबद्दल व्यक्त केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी