अ. भा.जनवादी महिला संघटना आक्रमक भाप्रसे कीर्ती किरण पुजार यांचा केला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध -NNL

पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत महिलांच्या आंदोलनास तात्पुरती स्थगिती


नांदेड|
श्री रेणुका देवी संस्थान माहुरगड येथील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यात याव्यात, शहरातील व नांदुसा,खुरगाव, चिखली येथील महिलांना घरकुल व रेशन कार्ड देण्यात यावे या मागणीसाठी जनवादी महिला संघटना नांदेड जिल्हा कमिटी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये महिलांना रेशन कार्ड नाही, घरकुल मिळत नाही ह्या अत्यंत गंभीर मागण्या जनवादी महिला संघटनेने उपस्थित केल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी संपूर्ण एक पीठ असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान माहुरगड येथील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात उदासीनता दाखविणारे संस्थानचे सचिव तथा किनवटचे उपविभागीय अधिकारी श्री किर्ती किरण पुजारी भाप्रसे यांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिलांनी निषेध व्यक्त करीत त्यांच्यावर राज्य सरकारने योग्य कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे. 

श्री रेणुका देवी संस्थान मध्ये मागील दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्कालीन संस्थांचे सचिव श्री अभिनव गोयल भाप्रसे यांनी दिलेल्या लेखी आश्वासन याप्रमाणे व संस्थांचे माननीय अध्यक्ष तथा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या स्वाक्षरीने पारित झालेल्या ठरावा प्रमाणे कर्मचार्‍यांना सेवा पुस्तिका व पगारवाढ देण्यात यावी ही मागणी मागील दोन महिन्यांपासून सातत्याने ऐरणीवर आल्याचे दिसून येते. दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी माहूर येथील टी पॉईंट येथे अ.भा किसान सभा, एस एफ आय, व सिटू च्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. 

परंतु संस्थांच्या सचिवावर काहीएक परिणाम झाला नसल्याने दिनांक 25 जानेवारी ते 27 जानेवारी 2022 रोजी तहसील कार्यालय माहूर  समोर 152 लोकांनी आमरण उपोषण केले आहे. माहूर तहसीलदार यांनी लेखी आश्वासन देऊन तातडीने मागण्या मान्य करून कर्मचार्‍यांना सेवा पुस्तिका देण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले असताना अध्याप कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. म्हणून अ.भा. जनवादी महिला संघटनेने दिनांक आठ मार्च दोन हजार बावीस रोजी जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी नांदेड यांना लेखी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु अध्यापक प्रशासनाने कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे  दिनांक 28 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर जमसं च्या शेकडो महिलांनी धरणे आंदोलन व उपोषण केले आहे. 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण हे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित असल्याने महिलांचे धरणे आंदोलन व उपोषण जिल्हा प्रशासनाने आश्वासने देऊन  स्थगित केले असून 29 मार्च रोजी योग्य निर्णय झाला नाही तर महिला आणखीही आक्रमक होणार आहेत अशी माहिती ज म सं च्या  नांदेड जिल्हा निमंत्रक कॉम्रेड करवंदा गायकवाड व नांदेड तालुका अध्यक्ष कॉम्रेड लता गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिली आहे. पदाचा दुरूपयोग करणाऱ्या संस्थांन च्या सचिवावर राज्य सरकारने योग्य कारवाई करावी अशी मागणी देखील जनवादी महिला संघटनेने केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी