कामळज येथील माजी सरपंच, भावासह पुतण्यावर रेतीमाफियांनी प्राणघातक हल्ला -NNL


नांदेड।
लोहा तालुक्यातील कामळज येथील माजी सरपंच, भावासह पुतण्यावर रेतीमाफियांनी प्राणघातक हल्ला करून जखमी केले ही घटना दि 25 रोजी दुपारी घडली आहे. यांत जखमी झालेल्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत 12 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाळू माफियांनी धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती काठावर पाणी सोडून रेती माफियांच्या रस्ता अडविला, तसेच याबाबत संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना तक्रार दिली होती. त्यामुळे दि.25 मार्च रोजी दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास मौजे कांबळज येथे सार्वजनिक रस्त्यावर संदीप रामराव ढेपे वय 26 वर्ष, केशव रामराव ढेपे वय 34 वर्ष, संजय शेषराव जाधव वय 35 वर्ष,  धनराज गोविंद जाधव वय 25 वर्ष , मधुकर गोविंद जाधव वय 24 वर्ष, गोविंद शेषराव जाधव वय 55 वर्ष, राजू संभाजी येडे वय 32 वर्ष, दत्ता संभाजी येडे वय 26 वर्ष, मारोती संभाजी येडे वय 23 वर्ष, संभाजी महाजन येडे वय 55 वर्ष, कामाजी विश्र्वनाथ भरकडे वय 38 वर्ष, देवराव दिगंबर भरकडे वय 35 वर्ष या सर्वांनी रेतीचा गोरखधंदा करत असल्याची तक्रार का केली असे म्हणून पांडूरंग बालाजी भरकडे यांना लोखंडी टॉमी, कुऱ्हाडी यांच्या सहाय्याने डोक्यात, पोटाच्या बरगडीवर मारहाण करून गंभीर दुखापत केले. 

वाळू माफियांनी पांडूरंग भरकडे यांचे काका आणि इतर साक्षीदारांना सुध्दा जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचेवर नांदेड येथे उपचार सुरू आहे. याबाबत उस्माननगर पोलीसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 56/2022  कलम 143, 147, 148, 149, 307, 324, 323, 504, 506 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उस्माननगरचे पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकते हे करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी