पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा विहिरीत पडला; सिरंजनीच्या शेतकऱ्यांनी दिले जीवदान -NNL

वनविभागाचे अधिकारी झाले होते दाखल 


हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील मौजे सिरंजनी परिसरात पाण्याच्या शोधात आलेल्या कोल्हा जातीचा वन्यप्राणी विहिरीत पडला होता. हा प्रकार लक्षात येताच येथील शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून सकाळी ९ वाजता वन्य प्राण्यास बाहेर काढून जीवदान दिले आहे. यावेळी  वनविभागाची टीम सुद्धा दाखल झाली होती.

हिमायतनगर तालुका परिसरात गेल्या महिन्याभरा पासुन उन्हाची तीव्रता वाढली आहे. उष्णतेने ४५ अंश सेल्सियसचा आकडा पार केला आहे. परिणामी विहिरी, बोअरची पाणी पातळी जमिनीला टेकली असून, नदी, तलाव कोरडेठाक पडले आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलातील झाडांची पानगळी झाल्याने सावलीचा आधार राहिला नाही. तसेच जंगल परिसरातील पाणवठे आटल्यामुळे नीळ, हरीण, मोर, लांडोर, रोही, ससे, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, वानरे, बिबट्या वाघ आदीसह अन्य वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.  


असाच प्रकार दि.२९ शुक्रवारच्या रात्रीला घडला असून, पाण्याच्या शोधत सिरंजनी रस्त्यावरील शेतीतील विहिरीकडे वन्यप्राणी कोल्हे आले होते. अचानक एक कोल्हा थेट ४० फुट खोल असलेल्या सौ.मेघा पवन करेवाड, सरपंच सिरंजनी यांच्या गट न.३७७ मधील विहिरीत पडला. रात्रभर कोल्हा विहिरीतुन बचावासाठी प्रयत्न करत होता. मात्र त्याला बाहेर निघत आले नाही. सकाळी ६ वाजता शेतमजूर फेरफटका मारताना विहिरीतून आवाज आल्याने पहिले असता कोल्हा जिवाच्या आकांताने ओरडत असल्याचे लक्षात आले. त्यांनी हि बाब शेत मालक नारायणराव करेवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आणि तत्काळ याची माहिती हिमायतनगरचे वनपाल श्री कदम यांना दिल्यानंतर त्यांनी भेट दिली. 

तत्पूर्वी रात्रभर पाण्यात आलेला कोल्हा तडफडत असल्याने येथील परमेश्वर करेवाड, मधुकर पालेवाड, हृतिक करेवाड, पावन करेवाड, नागनाथ गोखले, ज्ञानेश्वर अनेबोईंवाड शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून कोळ्यास दोरखंडाच्या साहाय्याने बांधून बाहेर काढले. कोल्हास सुखरूप बाहेर काढण्यास यश आल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला असून, बाहेर काढताच कोल्ह्याने धूम ठोकली आहे. एकूणच विहिरीत पडलेल्या कोल्ह्यास शेतकऱ्यांनी जीवदान दिल्याने वनपाल यांनी त्यांचे अभिनंदन केले असल्याचे माहीती युवा कार्यकर्ता पवन करेवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे. 

याबाबत हिमायतनगर वनपरिक्षेत्रचे वनपाल अमोल कदम यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माहिती मिळताच आमचे वनरक्षक, वनमजुर, कर्मचारी घटनास्थळी पोचले, आणि बाजेच्या सहाय्याने आमचे कर्मचारी व शेतकऱ्यांनी प्राण्यास बाहेर काढल्याने एका वन्य प्राण्यांच्या जीव वाचला असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी