ग्रंथदिंडी, मुलींचे लेझीम, आणि साहित्य जागराने गाजले वाकोडीचे मराठी साहित्य संस्कार संमेलन -NNL


नांदेड|
सूर्योदयासमयी पालखीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे ग्रंथ, भारतीय संविधानाची प्रत, विठ्ठल भक्तीत रंगलेली भजनी मंडळी, मुलींचे तालासुरातील लेझीम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेतील मुली-मुली यांच्यासह विद्यार्थ्यांची गावातून निघालेली दिंडी याने वाकोडी गावाला जणू सणावाराचे स्वरूप आले होते. सर्वत्र उत्साह- आनंदाला उधाण आले होते. आणि हे सर्व आले होते ते मराठी साहित्य संस्कार संमेलनामुळे.

वाकोडी ता. कळमनुरीच्या इतिहासात पहिल्यांदाच इसाप प्रकाशन संचालित मराठी साहित्य संस्कार मंडळातर्फे पहिले मराठी साहित्य संस्कार संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शंकर वाडेवाले हे होते तर उद्घाटक म्हणून कादंबरीकार बाबाराव मुसळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख केशव सखाराम देशमुख, देवीदास फुलारी उपस्थित होते. तर सत्कारमूर्तीत व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक विजय वाकडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, अनिल शेवाळकर, दिलीप नरहरे,बबन शिंदे, यशवंतराव चव्हाण विचार मंचचे नारायण शिंदे, प्रा डॉ. माधव जाधव, दिलीप दारव्हेकर, ग्रामीण साहित्यिक शफी बोलडेकर द. आ. गुडूप यांची उपस्थिती.


प्रारंभी सौ. संजीवनी डांगे यांच्या हस्ते दोन निराधार गरीब मजूर महिलांना साडी चोळी देऊन तर संमेलनाचे उद्घाटक व संमेलनाध्यक्षांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली व 'सत्कार्याचा दीप' उद्घाटकांच्या हस्ते प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आनंद पुपलवाड व स्वाती कान्हेगावकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनपर बोलताना ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांनी साहित्य हे अनुभवाची शिदोरी असून यातून व्यक्त होणाऱ्या भावना या समाजाचा आरसाच असतो, असे मत व्यक्त केले. आज-काल सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची घाई सुरू असून ही घाई प्रतिभेसाठी मारक ठरू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. व्यक्त झाल्याने महाकवी किंवा पुरस्कार मिळाल्याने मोठा कवी होता येत नाही त्यासाठी साहित्याची प्रतवारी महत्त्वाची ठरते, असेही ते म्हणाले.

संमेलनाध्यक्ष शंकर वाडेवाले आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की आज आदर्श जीवनपद्धती असल्याचा केवळ दिखावा केल्या जात असून आपण जसं बोलतो तसं मात्र वागत नाही. विशेषतः भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांनी याबाबत दक्ष असायला हवे. त्यामुळे संस्कार करणारी संमेलने होणे गरजेचे आहे. प्रमुख पाहुणे साहित्यिक देवीदास फुलारी यांनी साहित्य चळवळ कशी गतिमान होईल या संदर्भात मार्गदर्शन केले. लिहिणाऱ्यांची संख्या वाढल्याने अशी संमेलने ठिकाणी होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


संमेलनाचे प्रमुख पाहुणे केशव देशमुख यांनी दत्ता डांगे यांचे अभिनंदन करून प्रस्तुत संमेलन इतिहास ठरेल, असे मत मांडले. प्रास्ताविक साहित्य संस्कार मंडळाचे संस्थापक दत्ता डांगे यांनी केले. नवोदितांच्या पाठीशी आपण सदैव असून यातूनच सत्कार्याचा दीप तेवता ठेवण्याचे काम आपण करू आणि साहित्य संस्कार मंडळाची स्थापना करण्यामागे हीच प्रमुख भूमिका असल्याचे ते म्हणाले. स्वागताध्यक्ष शिवाजी भवर यांनीही आपल्या गावी साहित्य संमेलन होत आहे व मोठ्या साहित्यिक कांचे या गावी आगमन होत आहे याबद्दल आनंद होत असल्याची भावना भाषणातून बोलून दाखविली.  

यांवेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, संस्कार सन्मानपत्र व ग्रंथ सर्व सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजाराम बनसकर व प्रतापराव देशमुख यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर विजय गं. वाकडे यांची पंडित पाटील व मनोजकुमार थोरात यांनी मुलाखत घेतली. यावेळी वाकडे यांनी विविध साहित्य प्रकाराविषयी आपली मते मांडली. यानंतर प्रसिद्ध कथाकार प्रा. सु. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन झाले यात अध्यक्षांसह स्वाती कान्हेगावकर व सुप्रिया दापके यांनी सुंदर कथाकथन करून रसिकांची मने जिंकली.

यानंतर प्रा. डॉ. संगीता आवचार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. प्रारंभी कवयित्री वसुंधरा सुत्रावे यांच्या 'करुणासिंधु' या काव्यसंग्रहाचे संमेलनाध्यक्ष शंकर वाडेवाले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कविसंमेलनात प्रा. महेश मोरे, श्रीनिवास मस्के, राम क्षीरसागर, नीता कुलकर्णी, ज्योती नाईकवाडे, विजयकुमार वाकडे, दिगंबर बापुराव जाधव, राजाराम बनसकर, दिलीप चारठाणकर, सिंधुताई दहिफळे राजकुमार मोरगे, शफी बोलडेकर आदी कवींनी आपल्या कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी संतोष सेलूकर यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष व उपसरपंच शिवाजी भवर,  मुख्याध्यापिका ओममाला जाधव, प्रतापराव देशमुख, खंडबाराव नाईक आणि जि. प. प्रा. शाळा वाकोडीच्या सर्व शिक्षक आणि शिक्षिकांनी मौलिक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive