ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषदेचे अमूल्य योगदान - पालकमंत्री अशोक चव्हाण -NNL

जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षाचा आज शुभारंभ


नांदेड, अनिल मादसवार|
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून पंचायतराज व्यवस्थेला दूरदृष्टी मिळाली. ग्रामपंचायतीमध्ये लोक सहभागाचे महत्व अधोरेखित झाले. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रीयेमुळे ग्रामपंचायती आणि स्वराज्य संस्था बळकट झाल्या. लोकशाही व्यवस्थेत गाव पातळीवरील विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद स्थापनेच्या हीरक महोत्सवा निमित्त नांदेड जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ते बोलत होते.

कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आज संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजी धुळगंडे, बाबाराव एंबडवार, वैशाली चव्हाण, दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, शांताबाई पवार जवळगावकर, मंगाराणी अंबुलगेकर, गोविंद नागेलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहण्याचा हा काळ आहे. सामान्य जनतेच्या व विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेपर्यत विकासाच्या योजना पोहचाव्यात या दृष्टीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दळणवळणाच्या, दूरसंचार क्षेत्रात एक मुलभूत क्रांती आणून दाखविली. या पायावरच भारतातील इंटरनेटचे जाळे, माहितीचे आदान-प्रदान सहज व सुलभ झाले. नांदेड जिल्हा परिषदेतर्फे दुर्गम भागातील लोकाचे जिल्हा परिषदेसंदर्भातील प्रश्न सुटावेत या दृष्टीने स्वतंत्र तीन ॲप विकसित केले व ते जनतेच्या सेवेसाठी आजपासून खुले केले ही सुध्दा एक दुरगामी पाऊलच असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

मोबाईलच्या माध्यमातून आपल्या रोजच्या जगण्यातील सेवा-सुविधा व्यवस्थित पार पाडता येवू शकतात यांची प्रचिती आपण घेत आहोत हे स्पष्ट करुन त्यांनी भारतातील दूरसंचार क्रांतीला अधोरेखित केले. जनतेला विकासाशी निगडीत सेवा-सुविधा उपलब्ध करुन देताना याच्याशी निगडीत पुढील व्यवस्थापनही  तेवढेच महत्वाचे असते. ॲपच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही शंका, गरजा व प्रश्न आता थेट मुख्यालयापर्यत पोहचत असतील तर त्यांचे वेळ मर्यादेत निरसन व्हावे, प्रश्न मार्गी लागावा यादृष्टीनेही जिल्हा परिषदेने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


जिल्हा परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त एक विशेष समारंभ घेवून त्यात अधिकाधिक लोक सहभाग घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना दिल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करता येईल. उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांची कार्यशाळा घेऊन त्यांचे चांगले अनुभव इतर ग्रामपंचायती पर्यत पोहचविणे आवश्यक आहे. ज्या ग्रामपंचायतीनी आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी कशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली यांचे जर अनुभव एकमेकांना दिले तर इतर ग्रामपंचायतीनाही यातून बळ मिळेल असे त्यांनी सांगितले. प्रारंभी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा चित्ररथ व  फिरते कॅन्सर तपासणी व्हँनला पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेने विकसित करण्यात आलेले तक्रार निवारण प्रणाली ॲप, सुनोनेहा ॲप, पोषण श्रेणी ॲपचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

जवळगाव, हाडोळी, जोशी सांगवी, ईकळीमाळ, देवायचीवाडी व पळशी या ग्राम पंचायतींना आय.एस.ओ. मानांकन मिळाल्याबद्दल तसेच झरी ग्राम पंचायतीला केंद्र शासनाचा पंडीत दीनदयाळ पंचायत राज पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील 750 जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात काही शाळांना बांबू लागवड बिया व सिड बाँलचे वाटप पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या भित्ती पत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी पंचायत राज विषयी प्रा.डॉ. विठ्ठल दहिफळे यांचे समयोचित मार्गदर्शन झाले. ग्रामपंचायत ही ग्रामपातळीवरील शासनाची महत्त्वाची विकास संस्था आहे. नेतृत्व तयार करणे हा या संस्थेचा गाभा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सभापती स्वप्निल चव्हाण, शिलाताई निखाते, संजय बेळगे, बाळासाहेब रावणगावकर, संजय लहानकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रकाश चन्‍ना, लायन्स क्लबचे वसंत मैय्या, डॉ. अर्चना बजाज, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, व्हि.आर. पाटील, रेखा काळम-कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माध्‍यमिक प्रशांत डिग्रसकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, ओमप्रकाश निला, अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती. प्रारंभी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमस पुष्पहार अर्पण करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. उपस्थितीत मान्यवरांचा बुके व पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive