खैरगावच्या अर्धवट पुलामुळे यंदाही प्रवाशी नागरिकांना पावसाळ्यात अडचणींचा सामना करावा लागणार -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम गुत्तेदाराच्या निष्काळजी पणामुळे मागील पाच वर्षांपासून संथ गतीने चालू आहे. एवढेच नाहीतर या रस्त्यावरील बहुतांश पुलाचे काम कंत्राटदारांच्या नाकर्तेपणामुळे रखडले असून, गेल्या ३ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत ठेवल्या गेले आहे. त्यामुळे अनेकांचा जीव गेला असून, या पुलाच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यंदाही पावसाळाच्या काळात वाहनधारक शेतकरी, नागरिकांना अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार आहे. हि वेळ येणार नाही यासाठी संबधित गुत्तेदारांने तातडीने या पुलाचे काम पूर्ण करून संभाव्य धोका आणि अडचण सोडवावी अशी मागणी बाबुराव कदम कोहळीकर समर्थक दिनेश राठोड यांनी सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ व्हायरल करून केली आहे.        


हिमायतनगर तालुक्यातील मौजे खैरगाव ज. हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून, या गवानजीकच्या नाल्यावर गेल्या ३ वर्षांपासून भव्य पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र अद्यापही हे पूर्णत्वास गेले नसल्यामुळे पावसाळ्यात येथून मार्ग काढताना वाहनधारक, नागरिकांना, चिखलाचा सामना करावा लागतो तर उन्हाळ्यात धुळीचा त्रास होतो आहे. एवढंच नाहीतर याच रखडलेल्या पुलाच्या कामांमुळे खैरगाव (ज) गावाला पुरवठा होत असलेल्या विहीरीतलं पाणी तळाशी पोहचलेलं आहे. त्यामुळे या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या संपूर्ण गावकर्यांना पिण्याच्या पाण्याचा पण भयंकर त्रास जाणवतो आहे. तरीदेखील प्रशासकीय यंत्रणा व पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांने पुलाचे काम तातडीने पूर्ण कर्वे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या अर्धवट पुलाची समस्या  निकाली निघावी आणि पावसाळ्यात अडचण येऊ नये यासाठी शासकीय कंत्राटदार व प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात त्रस्त असलेली सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरुन मोठे आंदोलन उभं करण्याच्या तयारीत असल्याचे दिनेश राठोड यांनी सांगितले आहे. 


किनवट नांदेड या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामाला गेल्या पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरुवात करण्यात आले होते. रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून संबंधित ठेकेदाराने थातुर माथूर बांधकामाला संत गतीने सुरु केले. आजघडीला अद्यापही या रस्त्याचे आणि महामार्गावरील अनेक लहान मोठ्या पुला सहित महामार्ग मजबुती करणाचे काम अर्धवट आहे. केवळ संथ गतीने काम चालू असल्यामुळे या भागातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी पुन्हा एकदा पावसाळ्यात वारंवार किनवट हिमायतनगर महामार्ग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजही अनेक ठिकाणी प्रचंड खड्डेमय रस्ता खाच-खळगे, वाहनाने उडणारा प्रचंड धुराळा, अर्धवट खोदून ठेवलेले रस्ते, पुलासाठी बनवलेले वळण रस्ते इत्यादी अडथळ्यातून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे जिथे काम झाले त्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदरच तडे गेल्यामुळे ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने केले असल्याचे उघड होते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी