अध्यात्मात स्त्री-पुरुष भेद नसून दोघांना आध्यात्मिक उन्नतीची समान संधी -NNL

 महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परषिदेत ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरव


मुंबई| 
अध्यात्मात लिंगाच्या आधारे भेदभाव असत नाही. अध्यात्मशास्त्रात मार्गदर्शन करण्याची संधी स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक मिळत असल्याचे आढळत असले, तरी आध्यात्मिक उन्नती करण्याची संधी दोघांनाही समानच असते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते श्रीलंका येथे आयोजित 'दी एड्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वीमन्स स्डजीज' या वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. या परषिदेचे आयोजन 'दी इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट' यांनी केले होते. श्री. क्लार्क यांनी विश्‍वविद्यायाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित 'आध्यात्मिक उन्नतीशी निगडित लिंगाच्या आधारे भेदभावाला आव्हान' हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे सहलेखक श्री. क्लार्क आहेत. हे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे 93 वे सादरीकरण होते. या शोधनिबंधाला या परिषदेत 'उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा'ने गौरवण्यात आले.

श्री. क्लार्क यांनी या विषयाशी निगडित महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले संशोधन सादर केले. 'युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर' (यू.ए.एस्.) या ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्राच्या आधारे 24 साधकांच्या (पुरुष आणि स्त्रिया) प्रभावळींचा अभ्यास करण्यात आला. यात 4 गट करण्यात आले होते 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या वरील आणि या पातळीच्या खालील. '60 टक्के आध्यात्मिक पातळी', हा आध्यात्मिक साधनेतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे; कारण ही पातळी गाठल्यानंतर व्यक्ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होते. प्रत्येक गट पुन्हा 'आध्यात्मिक त्रास असलेले' आणि 'आध्यात्मिक त्रास नसलेले' या दोन गटांत विभागला होता. 

या चाचणीत दिसून आले की, 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या वरील साधकांमधील नकारात्मक उर्जेच्या प्रभावळींमध्ये पुरुष आणि स्त्री यांमध्ये काही विशेष फरक नव्हता. 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या खालील साधकांच्या गटामध्ये मात्र स्त्रियांमधील नकारात्मक उर्जेची प्रभावळ पुरुषांपेक्षा पुष्कळ अल्प (कमी) असल्याचे आढळले. 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या वरील साधकांमध्ये सकारात्मक उर्जेची प्रभावळ पुरुषांमध्ये थोडी जास्त असल्याचे आढळले, तर 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या खालील साधकांच्या गटात स्त्रियांमधील सकारात्मक उर्जेची प्रभावळ पुष्कळ अधिक आढळली. 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या वरील साधकांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ या पातळीच्या खालील साधकांच्या तुलनेत पुष्कळ अधिक होती. तसेच आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अल्प होती. यावरून आध्यात्मिक त्रास असणे, हे आध्यात्मिक उन्नतीमधील अडथळा असल्याचे लक्षात येते. त्यामुळे त्रास असलेल्या साधकांनी आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असते.

अन्य एका चाचणीत, चार साधकांनी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा नामजप प्रत्येकी 30 मिनिटे केला. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या वरील साधकांमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ केवळ 30 मिनिटांच्या एकाग्रतेने केलेल्या नामजपाने नष्ट झाल्याचे आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दुप्पट झाल्याचे आढळले. 60 टक्के आध्यात्मिक पातळीच्या खालील साधकांमधेही त्यांच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निम्म्याने न्यून (कमी) झाल्याचे, तर सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही पुष्कळ वाढल्याचे आढळले. यावरून पुरुष, तसेच स्त्रिया दैनंदिन आध्यात्मिक साधनेने आध्यात्मिक उन्नती करू शकतात, हे स्पष्ट झाले. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी जेवढी जास्त, तेवढा साधनेचा परिणाम अधिक होतो.

श्री. क्लार्क पुढे म्हणाले की, आपण जर नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्‍या कृतींमध्ये सामील झालो, तर आपण केलेल्या आध्यात्मिक साधनेचा परिणाम नष्ट होतो. अन्य एका चाचणीसाठी, प्रत्येकी एक पुरुष आणि स्त्री साधक यांनी मद्यपान केल्यावर, केवळ 5 मिनिटांमध्ये त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नष्ट झाल्याचे, तर केवळ अर्ध्या घंट्यामध्ये (तासामध्ये) त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे आढळले. त्यानंतर श्री. क्लार्क यांनी स्त्रियांच्या आध्यत्मिक उन्नतीवर परिणाम करणार्‍या केशभूषा, वेषभूषा, वस्त्रांचे रंग, अलंकार, इ. घटकांच्या संदर्भात केलेल्या संशोधनाची माहिती दिली. केशभूषेच्या अंतर्गत आंबाडा सर्वाधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करतो, तर केस मोकळे सोडल्याने बरोबर उलटा परिणाम होत असल्याचे आढळले आहे. वस्त्रांमध्ये योग्य पद्धतीने साडी परिधान करणे सर्वाधिक सात्त्विक आहे. अलंकारही स्त्रियांच्या सकारात्मकतेमध्ये वाढ किंवा घट करू शकतात. हे अलंकारामध्ये वापरलेला धातू, त्याची नक्षी (डिझाइन) आणि त्यात जडवलेली रत्ने यांवर अवलंबून असते.

पुरुष आणि स्त्रियांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल विचार करता, पुरुषांच्या तुलनेत सर्वसाधारणतः स्त्रियांमधील भावनाशीलता हा त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीमधील सर्वात मोठा अडथळा असल्याचे आढळले. मात्र स्त्रियांमध्ये बुद्धीचा अडथळा अल्प (कमी) आणि श्रद्धा अधिक असते, ही त्यांची जमेची बाजू होय. आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रद्धा अत्यंत महत्त्वाची असते. श्री. क्लार्क म्हणाले की, पुरुष आणि स्त्री हे दोघेही एकमेकांपासून शिकू शकतात, तसेच साधनेसाठी केलेल्या प्रयत्नांवर आध्यात्मिक उन्न्ती अवलंबून असते आणि इतरांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याची क्षमता व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीवर आणि ज्ञानप्राप्तीवर अवलंबून असते. 

श्री. आशिष सावंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, (संपर्क : 95615 74972)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी