पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन नको ! - हिंदु जनजागृती समिती -NNL


मुंबई|
पंढरपूरच्या श्री विठ्ठलमूर्तीची होत असलेली झीज थांबवण्यासाठी पुन्हा एकदा वज्रलेपाच्या नावे रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. मंदिर आणि त्यातील सर्व विधी हे धर्माशी संबंधित असल्याने तेथील प्रत्येक विधी हा धर्मशास्त्र सुसंगत होणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार मूर्तीची झीज होत असल्यास त्यावर काय करावे, हेही धर्मशास्त्रानुसारच ठरवायला हवे. धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन यापूर्वी करूनही श्री विठ्ठल मूर्तीची झीज थांबलेली नाही. तरी पुन्हा हीच प्रक्रिया करून काय साध्य होणार? कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर केलेला वज्रलेप कुचकामी ठरला. 

अवघ्या वर्षभरातच मूर्तीवरील वज्रलेप निघू लागला, पांढरे डाग पडले, मूर्तीची झीज चालूच आहे, तसेच या प्रक्रियेत मूर्तीच्या मस्तकावरील नागाचे प्रतिकृती दिसेनाशी झाली. अशाप्रकारे श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाबतीत होणार नाही, याची शाश्‍वती कोण देणार ? यामुळे पूर्वानुभवानुसार या वज्रलेपाचे दायित्व नेमके कोणाचे असेल आणि त्यात काही अनुचित घडल्यास कोण जबाबदार असणार, हे विठ्ठलभक्तांना अगोदरच स्पष्ट केले पाहिजे. म्हणून धर्मशास्त्रांत सांगितल्यानुसार आणि धार्मिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊनच धार्मिक पद्धतीने उपाय योजावेत आणि मूर्तीवर रासायनिक लेपन करू नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

रासायनिक लेपन प्रकियेत विविध रासायनिक द्रव्यांचा वापर केल्याने मूर्तीच्या सात्त्विकतेत घट होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित असतात, हा अध्यात्मशास्त्रातील मूलभूत सिद्धांत आहे. श्री विठ्ठलाच्या रूपातूनही ही शक्ती प्रक्षेपित होत असते. या प्रक्रियेत मूर्तीवर रासायनिक द्रव्यांचे थर देण्यात येतात, परिणामी मूर्तीच्या मूळ रूपात पालट होतात. जर मूर्तीच्या रूपात पालट झाला, तर मूर्तीतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचे प्रमाण घटते, परिणामी भाविक मिळणार्‍या आध्यात्मिक लाभापासून भाविक वंचित रहातील. भाविकांना देवतेच्या तत्त्वापासून वंचित ठेवणे, ही घोडचूक नव्हे, ते मोठे पाप ठरेल.

मूर्ती ही केवळ दगडाची वस्तू नसून त्यात देवत्व असते, ही भाविकांची श्रद्धा असते. तिच्यावर लेपन करायला ती काही निर्जीव वस्तू नाही. विविध क्षेत्रांतील अडचणींवर त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मंदिर ही हिंदु धर्माशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मूर्तीची झीज आणि त्यांवरील उपायांच्या संदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती म्हणजे संत, धर्माचार्य, शंकराचार्य आदींचे मार्गदर्शन घेऊन कृती करायला हव्यात. त्यामुळे पुरातत्त्व खाते नव्हे, तर धर्मशास्त्र काय सांगते, हे पहाणे आवश्यक आहे.

ओडिशा येथील जगन्नाथपुरी मंदिरातील श्री जगन्नाथ, श्री बळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन या देवतांच्या काष्ठमूर्ती प्रत्येक 12 वर्षांनी पालटून नव्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठापना केली जाते. इतकेच काय गणेशोत्सव काळातही श्रीगणेशमूर्ती भंग पावल्यास अथवा दुखावली गेल्यास, ती मूर्ती विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना केली जाते आणि तिच्यात प्राणप्रतिष्ठापना केली जाते. याच विचार करणे धर्मशास्त्रदृष्ट्या सर्वथा योग्य ठरेल.

श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 70203 83264)


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive