ज्ञानव्यापी मशीद, हिजाब, हलालावर गोंधळ घालणारे बेरोजगारी महागाई, इंधनदरवाढीबाबत गप्प का?: नाना पटोले -NNL

धार्मिक उन्माद वाढवून ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न.


मुंबई|
देशात सध्या बेरोजगारी, महागाईसारखे ज्वलंत प्रश्न असताना ज्ञानव्यापी मशिद, हलाला, झटका, हिजाब असे मुद्दे समोर केले जात आहेत हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने हे प्रश्न सोडून जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर लक्ष देऊन त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करावा याकामी विरोधीपक्ष म्हणून सरकारला काही मदत हवी असेल तर ती देण्यास काँग्रेस पक्ष कधीही तयार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा, हिजाब, हलाला, झटका या मुद्द्यांमुळे देशातील बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सुटत असतील तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण यामुळे जर देशाचे मानसिक विभाजन होत असेल, देशात गुंतवणूक येत नसेल, देशातील बेरोजगारी वाढत असेल आणि एक समाज दुसऱ्या समजासमोर जर उभा राहत असेल तर हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे, या गोष्टींचा आम्ही निषेध करतो.

देशात महागाईचा आलेख वाढत असून एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर १५.८ टक्क्यांपर्यंत गेला आहे तो दहा वर्षांतील उच्चांक आहे. सलग तेरा महिन्यापासून महागाईचा दर वाढत आहे. अन्नधान्य, डाळी, गहू, खाद्यतेल, इंधन, गॅस, भाज्या यांचे दर सामान्यांना परवडणारे राहिले नाहीत. बेरोजगारीने ४५ वर्षांतील उच्चांक केला आहे. सरकारी नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत असताना रेल्वेच्या ७२ हजार नोकऱ्या संपवण्यात आल्या आहेत. देश सध्या एका कठीण परिस्थितीतून जात असताना मंदिर-मशिद, हिजाब, हलाला या मुद्द्यांना महत्व दिले जात असून ज्वलंत प्रश्नांकडे डोळेझाक करण्याच्या केंद्रातील भाजपा सरकारच्या भूमिकेची मोठी किंमत मात्र १३० कोटी जनतेला मोजावी लागत आहे, असेही पटोले म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी