नांदेड परिमंडळातील कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी‘माविकसं’ची 23 रोजी द्वारसभा -NNL


नांदेड|
वीज वितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या सुमारे 17 मागण्यांसाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या म्हणजेच माविकसंच्यावतीने येत्या दि.23 रोजी विद्युत भवन समोर द्वारसभा घेतली जाणार आहे.

माविकसंचे झोन अध्यक्ष एस.एम.घुले व झोन सचिव प्रमोद बुक्कावार यांनी नांदेडच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत निवेदन दिले आहे. नांदेड परिमंडळातील कार्यरत अभियंता व कर्मचारी हे वीज बील वसुली व विजेची चोरी रोखण्यासाठी ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवून दर्जेदार सेवा देत आहेत. तरी देखील अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करीत आहेत. त्यामुळे कामगारांचे मानसीक खच्चीकरण होवून हे सर्वजण तणावाखाली काम करीत आहेत. तेंव्हा कंपनीचे काम तणावमुक्त करण्याची पहिली मागणी माविकसंने केली आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यात संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटील यांनी मुख्य अभियंत्यांना याबाबत पत्र लिहिले होते. परंतु त्यावर काहीही कार्यवाही अथवा चर्चा झाली नाही, असे एस.एम.घुले यांनी नमूद केले आहे. 

भोकर विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.एस.चितळे यांच्या मनमानी कारभारामुळे कर्मचार्‍यांवर दबाव येवून कार्यक्षमता कमी होत आहे. म्हणून त्यांच्याकडील भोकर विभागाचा अतिरिक्त कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी माविकसंने केली आहे. आर.एस.चितळे यांच्या कारभाराचा एक नमुना म्हणजे वसुली कर्मचार्‍यांना सकाळी 8 वाजता व रात्री 9 वाजता वसुलीचे फोटो टाकणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांची ड्युटी आपोआपच तेरा तासांची होते. याशिवाय साप्ताहिक सुट्टी, सीएल, ईएल मिळत नाही. लग्नविधी व अंत्यविधीला सुध्दा हे कर्मचारी जावू शकत नाहीत. चितळे यांची व्हीडीओ कॉन्फरन्स दिवसभरात कधीही होते त्याला कसलेही वेळापत्रक नाही. अशा कारभारामुळे कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. 

प्रभारी कार्यकारी अभियंता आर.एच. चितळे यांच्या मनमानी कारभाराला मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर हे पाठीशी घालून कर्मचार्‍यांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप माविकसंने केला आहे. वरील दोन मागण्यांशिवाय अन्य पंधरा मागण्या माविकसंने केल्या आहेत. या मागण्यांसाठी येत्या दि.23 रोजी दुपारी दीड वाजता विद्युत भवन समोर द्वारसभा घेवून निदर्शने करण्याचा इशारा माविकसंने दिला आहे. मागण्या केलेले प्रश्न 29 जून पर्यंत न सुटल्यास दि.30 जून पासून नांदेड सर्कलमध्ये असहकार आंदोलन करण्याचा इशारा देखील एस.एम.घुले व प्रमोद बुक्कावार यांनी दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी