चक्क कोऱ्या चेकबुकसह मासिक,ग्रामसभांच्या कोऱ्याच रजीस्टरवर ग्रामसेवकांने सह्या घेतल्या -NNL

गविअ केंद्रे यांच्याकडून पाठराखण ; बहुचर्चित मेळगांवच्या सरपंचासह ४ ग्रामपंचायत सदस्य उपोषणाच्या पावित्र्यात !


नायगांव बा./नांदेड।
चक्क कोऱ्या चेकबुक आणि मासिक व ग्रामसभांच्या रजीस्टरवर ग्रामसेवक एन.एस. यरसनवार यांनी आपल्या सह्या घेतल्या असून नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून मात्र त्यांची पाठराखण होत असल्याने याबाबत कायदेशीर कारवाईसाठी त्यांच्याच कार्यालयासमोर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जून रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे मेळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच एम.एन.धसाडे यांच्यासह तब्बल ४ ग्रामपंचायत सदस्यांनी दोन स्वतंत्र तक्रारीद्वारे संबधितांना ईशारा दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की,मेळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच एम.एन. धसाडे यांनी आपल्या तक्रारीत ग्रामसेवक एन.एस.यरसनवार यांनी आपल्या कार्यकाळात विविध योजनानिहाय निधीच्या विनियोगाची कोणतीच माहिती न देता चक्क कोऱ्या चेकबुकवर तसेच,प्रत्येक मासिक व ग्रामसभांच्याही कोऱ्याच रजीस्टरवर स्वाक्षरी घेतलेल्या आहेत याबाबत वेळोवेळी विनंतीनंतरही माहिती देण्याऐवजी स्थानिक प्रस्थापित राजकीय लोकांना हाताशी धरुन जातियद्वेषातून राजकीय दाबदडपण टाकत आहेत. त्यामूळे त्याचेवर कायदेशीर कारवाई करावी सोबतच, आपण उपस्थित असल्याशिवाय आपल्या यापूर्वी स्वाक्षरी केलेले  कोणतेही चेक वठविण्यात येऊ नयेत असे संबंधित बँकांना सूचित करावे असे नमूद केले आहे.

दुसर्‍या तक्रारीत त्यांच्यासह गंगाधर धारोबा कंदरवाड,माधव बालाजी शिंदे व सौ.भारतबाई अशोक महिपाळे या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक यरसनवार यांनी त्यांच्या कार्यकाळातील मासिक व ग्रामसभांच्या कोऱ्या रजीस्टरवर कोणतेही विषय व इतिवृत्त न देता आपल्या स्वाक्षरी घेतलेल्या असल्याने संबधित ग्रामसेवकांच्या कार्यकाळातील ग्रामपंचायतीचे सर्व अभिलेखे, दस्ताऐवज तात्काळ जप्तीसह त्याबाबत व ग्रामपंचायतीला योजनानिहाय प्राप्त निधी व विनियोगाची सक्षम अधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशी करावी अशी विनंती केली आहे.त्यात संबधित ग्रामसेवकाच्या या कृत्यासह ते मुख्यालयी वास्तव्य दूरच आठवड्यातून एखादे-दोन दिवसही ग्रामपंचायतीला येत नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक तसेच,अनेक योजनांत लाभार्थींना प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत सोबतच, शासनाच्या विविध योजना माहिती देत नसल्याने त्या प्रचार व प्रसाराअभावी रखडलेल्या आहेत.

 याबाबत गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांना समक्ष विनंतीनंतरही ते यावर कार्यवाहीऐवजी दोषी ग्रामसेवकाची पाठराखण करीत असल्याचे स्पष्ट करुन त्यांच्याच नांवे तक्रार देत तातडीने कार्यवाही करा अन्यथा आपल्याच कार्यालयासमोर येत्या दि.२६ जून पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे कळविले आहे.या तक्रारीच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,ग्रामविकास या विभागाचे मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मुख्य सचिव,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,सामान्य प्रशासन व पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, नायगांवचे तहसीलदार व संबधित विभागांना देण्यात आल्याचे सरपंच धसाडे यांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे तत्कालीन बिलोली व सध्याच्या नायगांव तालुक्यातच नव्हे तर,जिल्हा व राज्यात एकेकाळी स्वच्छता अभियानात अग्रेसर असलेली मेळगांव ग्रामपंचायत गत कांही वर्षात राजकीय कुरघोडीत बहुचर्चित बनली आहे. शासनाकडून ग्रामपंचायतीला योजनानिहाय त्याचबरोबर,गौण खनिज विभागाकडूनही वर्षाकाठी लाखो रुपयांचा निधी मिळतो आहे.त्यातून गांवचा विकास साधण्याऐवजी स्वविकासावरच स्थानिकच्या काही प्रस्थापित राजकीय मंडळीचा भर आहे.

त्यामूळे 'एका' प्रकरणात येथिल यापूर्वीचे सरपंच अपात्र ठरल्यानंतर काही काळ उपसरपंचानी पदभार सांभाळून निधी खर्चित केला. सरपंच पदासाठीच्या रिक्त जागेसाठी येथिल दोन्ही गटांनी एकत्र येत निवडणूक लढविली त्यात विजयानंतर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या  सरपंचपदावर नव्याने सदस्य म्हणून निवडून आलेले एम.एन.धसाडे यांची वर्णी लागली परंतू,त्यांच्यावर जणू मेहरबानीचा आव आणून त्यांच्या कोऱ्या चेकबुकवर व त्यांच्यासह अन्य सदस्यांच्या कोऱ्या रजिस्टरवर सह्या घेऊन त्यांना दमदाटी करणे तक्रारी केलात तर,तुमच्याच स्वाक्षरी आहेत तुम्हीच अडकाल म्हणून गप्प बसविणे हा प्रकार संगनमतातून ग्रामसेवक व संबधित राजकारणी यांच्याकडून सुरु असल्याचे बोलल्या जाते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी