गोविंद पुराणिम यांच्या गीत गोविंद भक्ती गीत संग्रहाचे थाटात प्रकाशन -NNL


नांदेड|
 
गीत गोविंद या भक्तीगितांच्या संग्रहाच्या माध्यमातून गोविंद पुराणिक यांनी गेल्या अनेक वर्षापासून जतन केलेल्या रचना संग्रहीत करुन वाचकांना वेगवेगळ्या संत-महंताच्या विचारांची अनुभूती देत असतानाच नव्या पिढीला मार्गदर्शक अशा पुस्तकाची निर्मिती करुन एक वेगळा इतिहास निर्माण केला असून, त्या माध्यमातून एक वेगळा विचार समाजापुढे ठेवला आहे, असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले.

प्रख्यात निवेदक, समीक्षक, कवी गोविंद पुराणिक लिखित, हिंदू धर्मातील विविध पंथोपपंथातील संत, सद्गुरू व इष्ट देवतांच्या स्तवनांनी नटलेल्या गीत गोविंद या भक्तीगीत संग्रहाचे प्रकाशन, हनुमान मंदिर, अशोकनगर नांदेड येथे रविवारी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी, वे.शा.संपन्न विश्वासशास्त्री घोडजकर होते, तर प्रमुख वक्ते जेष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी, प्रमुख पाहुणे, दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, मिलींद देशमुख, व हनुमान मंदिर न्यासाचे अध्यक्ष संजय गोळेगावकर यांची होती.

गीतगोविंदचे रचनाकार गोविंद पुराणिक आणि मुद्रक व प्रकाशक अमोल अंबेकर यांची  समयोचित भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात या पुस्तकाच्या प्रकाशना मागची भूमिका विशद करत त्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी संग्राहबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन केले. यातील निवडक गीतांची ध्वनी मुद्रिका तयार करण्यासाठी यापुढे गोविंद पुराणिम यांनी प्रयत्न करावेत, कदाचित महाराष्ट्रात अशा प्रकारचे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले असून, नव्या पिढीला संत महात्म्यांची महती कळावी हा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.  या पुस्तकातील निवडक गितांना संगीतबध्द करुन त्याचा एक कार्यक्रम पुराणिक यांनी हाती घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

देवीदास फुलारी यांनी आपल्या सविस्तर भाषणात गीतगोविंद संग्रह आणि गोविंद पुराणिक यांचे जीवनकार्य याचा अतिशय सुंदर शब्दांत आलेख मांडला. ते म्हणाले की, देशभरातील नावाजलेल्या संत-महंतांच्या रचना निर्माण करुन त्यांच्या जीवनाचा आलेख या रचनामधून मांडला आहे. पुराणिक यांच्या आजपर्यंतच्या कामाचा अनुभव आपल्याला माहित असून, अत्यंत संयमीपणे त्यांनी आपले आयुष्य जगताना आपल्या सहकाNयांचेही कल्याण केले आहे. 

अन्यायाच्या विरुध्द बंड पुकारताना त्यातही संयमशिलता दाखवून आपल्या वेगळ्या गुणांचा परिचय त्यांनी समाजाला करुन दिला. निवेदक, समिक्षक व कवी या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे फुलारी यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय समारोपात घोडजकर गुरूजी यांनी गीतगोविंद हा विविध पंथांचा समन्वय साधणारा संग्रह आहे, असे सांगून या पुस्तकाचे अध्यात्मिक मूल्य आपल्या प्रासादिक वाणीतून विषद केले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ. अंबालिका शेटे यांनी केले. सरस्वती वंदनेचे गायन कु. अपूर्वा कुलकर्णी हिने तर आभार प्रदर्शन गिरीश देशमुख यांनी केले. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी