अर्धापूर-मुदखेड- भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांना बागायती प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी -NNL

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन

अर्धापूर| अतिवृष्टी व महापूराने खरीप हंगामातील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.  हि नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे. पण यासोबतच अर्धापूर आणि मुदखेड बागायती क्षेत्र असूनही नेहमीच बागायती प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतात. परिसरात केळी आणि हळदीचे  मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या पिकांचे अतिवृष्टी आणि महापूराने मोठे नुकसान झाले आहे. अर्धापूर, भोकर व मुदखेड तालुक्यात बागायती प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,  संबंध एक महिनाभर हि पिके पाण्याखाली होती.  त्यामुळे केळीच्या पिकाची मुळे पूर्णतः कुजून गेली आहेत.  यामुळे या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे प्रतिक्विंटल अडीच हजार रुपयावरील दर चक्क पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत आला आहे. या पिकात शेतकऱ्यांना 75 टक्के आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. तसेच हळदीच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. गतवर्षी अतिवृष्टीने हळदीच्या पिकात उत्पादनात ७५ टक्के घट झाली होती. जमिनीतच हळद सडल्यामुळे साधारणपणे एकरी २५ ते ३० क्विंटल येणारे अव्हरेज केवळ पाच ते दहा क्विंटलवर येऊन ठेपले होते. यावर्षी गतवर्षी पेक्षा भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनातही मोठी घट होणार आहे.

प्रशासनाकडून केवळ जिरायती प्रमाणेच नुकसान दाखवले आहे. गंभीर बाब म्हणजे बागायती पिकांचे शून्य टक्के नुकसान दाखवले आहे. जिरायती प्रमाणे केवळ हेक्टरी १३ हजार ६०० इतकीच तुटपुंजी मदत मिळते. पण हीच नुकसान भरपाई बागायती प्रमाणे मिळाल्यास हेक्टरी २७ हजार रुपये मिळू शकते. सध्या केळीला फळाचा दर्जा मिळाला असून त्यानुसार मदत मिळाल्यास हेक्टरी ३६ हजार रुपये मदत मिळू शकते. या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन सुद्धा मदत मिळत नाही.  या भागातील शेतकऱ्यांना बागायती प्रमाणे मदत मिळवून द्यावी. असे निवेदन कृषी मंत्री यांची प्रत्यक्ष भेट देऊन दिले आहे. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर कदम पाटील, माजी जि. प.सदस्य रामराव भालेराव, अशोकराव बुटले, अवधूत कदम, देविदास पाटील कल्याणकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी