राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आणि ध्वजसंहिता -NNL


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वत्र शासकीय निमशासकीय कार्यालये संस्था तसेच विविध मंडळे प्रतिष्ठाने त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही यात सहभाग घेतला आणि 'घरोघरी तिरंगा' या अभियानास लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त करून दिले. शाळा महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली. यात प्रशासनानेही विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन आणि प्रसारमाध्यमांचा वापर करीत कंबर कसली होती. अनेक शाळांमध्ये वृक्षारोपण आणि वृक्षांचे वाढदिवस साजरे करीत 'एक मूल - एक झाड - एक तिरंगा' हा अनोखा उपक्रम राबविला. काहींनी तर रक्षाबंधनाच्या औचित्याने तिरंगी झेंड्यालाच राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी केली. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात देशभक्ती, जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत करून सर्वत्र चैतन्य निर्माण करण्याच्या कामी देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात यावा याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.


 आता आजपासून १३ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर, कार्यालयांवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यासाठी ध्वजसंहितेत शिथिलता आणण्यात आली. घरावरील ध्वज एकदा फडकवल्यानंतर तीन दिवस तसाच ठेवता येणार आहे. मात्र कार्यालयांना तसे करता येणार नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो.  सध्या अनेक जण ध्वज खरेदी करून आपल्या वाहनांवर बांधत आहेत. ठिकठिकाणी ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी सर्व भारतीय नागरिकांनी ध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली. म्हणूनच हा दिवस आपला गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या तिरंगी ध्वजाचा मान राखणे, हे साऱ्या देशवासीयांचे कर्तव्य आहे. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्’ने १९५१मध्ये ध्वजासंदर्भात पहिल्यांदा काही नियम जाहीर केले. १९६४ मध्ये त्यात बदल करण्यात आले. १७ ऑगस्ट १९६८ रोजी त्यात आणखी काही बदल करण्यात आले. ध्वजाचा आकार, निर्मिती, रंग आदी सर्वच बाबतींत हे नियम लागू करण्यात आले.

        सूर्योदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे. काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकवायचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असावा लागतो. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असावा लागतो. राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी ध्वजसंहिता २००२ चे पालन केले पाहिजे. तसेच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा १९७१ चेही पालन करायला हवे. या संहितेच्या २.१ या कलमानुसार सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान ठेवून कोणत्याही ठिकाणी ध्वज फडकावण्यावर बंदी नाही. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास मात्र तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे.

 
     २० जुलै २०२२ ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती.
३० डिसेंबर २०२१ ला केलेल्या बदलानुसार पॉलिस्टरच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी दिली होती. याआधी फक्त खादीच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती. सरकारची ध्वजसंहिता याआधी अतिशय कडक होती. आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आली आहे. तरीही राष्ट्रध्वज फडकावतांना काही गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये. कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये. ध्वज फडकावताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी. ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.  राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये. जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.

      घरोघरी तिरंगा ही एक आता लोकचळवळ झाली आहे. लोकांनी राष्ट्राप्रति आपल्या श्रद्धा, मंगल भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रत्येकाने आनंदाने हौसेने तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकवायचा आहे. परंतु ज्यांना घरच नाही अशांनी कुठे लावायचा? हरेकाला घर, हर घराला रोजगार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत. तसेच 'हर घर संविधान' हे अभियान सुद्धा राबविले पाहिजे, अशी मागणी संविधानप्रेमी करीत आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आवाहन करीत असल्यामुळे विरोधक घरी ध्वज फडकविण्यावरुन विरोध करीत आहेत. केंद्र सरकार भाजपाचे असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही त्यांच्या मुख्यालयावर किंवा शाखा कार्यालयावर तिरंगा फडकविला नाही आणि ते आता सर्वांना घरावर तिरंगा फडकवावा असे सांगत आहेत अशा खोचक टीका सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात झाल्या. देशात अनेक प्रश्न आहेत. परंतु ही पंच्याहत्तरी काही टाळ्या, थाळ्या वाजविण्याचा किंवा दिवे लावण्याची परिस्थिती दर्शवणारी नाही. हा सुवर्णमहोत्सव आहे. तो आपण प्रत्येकाने साजरा करायचा आहे. अशोक चक्रांकित तिरंगा आपले राष्ट्रीय प्रतिक आहे. तिरंगा देशाची आण, बान, शान आहे. देशाचा अभिमान आहे. आजपासून तीन दिवस आपण आपल्या घरावर तिरंगा फडकवून भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव 
साजरा करु या!

        - प्रज्ञाधर ढवळे, नांदेड
           मो. ९८९०२४७९५३.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी