चळवळीमधूनच समाजाचे प्रश्न सुटतील-डॉ.काब्दे -NNL


नांदेड|
कामगार चळवळी सशक्त झाल्याशिवाय समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न सुटणार नाहीत, असा विश्वास माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनच्या 13 वे राज्यस्तरीय अधिवेशन पीपल्स महाविद्यालय परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात मोठ्या थाटात संपन्न झाले. या परिसराला दिवंगत कामगार नेते कॉ.अनंतराव नागापूरकर असे नाव देण्यात आले होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ.कारभारी उगले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हंसराज वैद्य, ऍड. वर्षा देशपांडे, ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) चे राज्यसचिव कॉ.श्यामजी काळे, कॉ.उदय चौधरी, ऍड.सुधीर टोकेकर, भारती न्यालपेली आदी उपस्थित होते.  

या अधिवेशनाचे उद्घाटन करताना डॉ.काब्दे म्हणाले की, सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस गरीब गरीब होत आहे. मुठभर श्रीमंतांच्या धनात मोठी वाढ दिसून येत आहे. कामगार, कष्टकर्‍यांच्या श्रमातुनच श्रीमंतांचे वैभव निर्माण होते. कामगार, कष्टकर्‍यांनी स्वतःच्या कायदेशीर अधिकाराच्या लढाईसह सामाजिक प्रश्नांवरही आंदोलने केली पाहिजे. सामाजिक परिवर्तनात कामगार चळवळीचे मोठे योगदान आहे. त्यातुनच सामाजिक विषमता व समाजाचे प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना कॉ.कारभारी उगले यांनी राज्य आणि देशातल्या विडी कामगार चळवळीचा आढावा घेतला. 

विडी कामगारांना देशपातळीवर एकच किमान वेतन लागू करावे. कामगारांनी स्वतःच्या न्याय-हक्कांसोबतच सामाजिक विषमतेच्या होणार्‍या चळवळीमध्ये सहभागी व्हावे असे सांगून कामगारांनी राजकीय भूमीका घेतल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. आयटकचे राज्य सचिव श्याम काळे यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा समाचार घेवून येणार्‍या 2024 मध्ये कामगार, कष्टकर्‍यांनी कुठल्याही भुलथापांना बळी न पडता सत्ता परिवर्तन करावे, असे आवाहन केले. तर ऍड. वर्षा देशपांडे यांनी कामगार कायद्यात होणारे बदल मालक धार्जिने असून याविरुध्द सर्वच क्षेत्रातील कामगारांनी शेतकर्‍यांसारखे पेटून उठण्याची गरज असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार नेते कॉ.ऍड.प्रदीप नागापूरकर यांनी केले तर सुत्रसंचालन कॉ.के.के.जांबकर यांनी केले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉ. यादगिरी श्रीराम, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.गुरु पुट्टा, कॉ.पद्मा तुम्मा, कॉ.शारदा गुरुपवार, कॉ.कलावती कोंडपाक, कॉ.अख्तर, कॉ.जब्बारखान पठाण, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.देवराव नारे, कॉ.दत्ता काळेवाड आदींनी परिश्रम घेतले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी