माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचं दु:खद निधन -NNL


नांदेड।
जिल्ह्यातील राजकारणातील हिरा, निष्कलंक, निस्वार्थी, धाडसी व्यक्तिमत्व, एक संघर्षयोद्धा, चारित्र्यवान, देवमाणूस जिल्ह्याच्या राजकारणातील विविध पदे यशस्वीपणे निभावलेला एक आदर्श नेता म्हणून ज्यांची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.
असे व्यक्तिमत्व, नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ, लोकनेते,माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच दु:खद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो अश्या शब्दात सर्व स्तरातील नागरिक, राजकीय नेतेमंडळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी ४ वाजता गोरठा (ता. उमरी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची काल प्रकृती बिघडल्याने त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हायपॉवर व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे मतदारसंघात शोककळा पसरली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता. तसेच कार्यकर्त्यांचे जाळेही होते. आजही त्यांची मतदारसंघात चांगलीच पकड होती. त्यामुळे भोकर तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने तालुक्याचे मोठे नुकसान झाल आहे.

बापूसाहेब गोरठेकर यांचे वडिल स्व. बाबासाहेब गोरठेकर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते. ते राष्ट्रवादीकडून अनेकदा आमदार झाले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत बापूसाहेब यांनीही राष्ट्रावादीचा वसा घेतला. भोकर विधानसभा लढता लढता नायगाव विधानसभा निवडणूक लढवली त्या ठिकाणी मात्र त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत काम केले, पुन्हा परत आपल्या मूळ पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घरवापसी केली होती असे सांगितले जाते.
माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या निधनामुळे लोकांपर्यंत जाऊन काम करणारे एक ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. अशी भावना व्यक्त करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी