लम्पी आजारावरील लसीकरण 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करा -जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी -NNL

लसीकरणात दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई 


नांदेड|
जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ती गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. लम्पी आजारावर नियत्रंण व प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 

जिल्ह्यातील पशुधनास लम्पी आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी 100 टक्के लसीकरण 30 सप्टेंबर पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले. परदेशी यांनी आज लिंबगाव येथे रोगप्रतिबंधक लसीकरण कॅम्पला भेट देवून पशुपालकांची विचारपूस केली. तसेच गोचीड, गोमाशापासून गोठे फवारणी करुन घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. 

पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी रोगाच्या संदर्भात पशुपालकांमध्ये भिती निर्माण होऊ नये म्हणून लसीकरणासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लसीकरण प्रक्रीयेत कोणीही दुर्लक्ष करता कामा नये अन्यथा त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी आढावा वैठकीत दिला. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लसीकरण एका आठवड्यात पूर्ण करावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात लस व औषधीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी पशुधनाच्या निकषानुसार लस व औषधी पुरवठा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या नियोजनातून करण्यात येत आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी