विविध धार्मिक उत्सवात प्रत्येक नांदेड जिल्हावासीय शांतता व सलोख्याला प्राधान्य देईल - जील्हाधिकारी खुशालसिंह परदेशी -NNL

शांतता समितीची बैठक संपन्न 


नांदेड, अनिल मादसवार| 
येत्या 26 तारखेला घटस्थापना व दुर्गादेवीची स्थापना होऊन नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. याचबरोबर 5 ऑक्टोंबरला दसरा उत्सव, दिनांक 6 व 7 ऑक्टोंबर रोजी दुर्गा देवीच्या मुर्तीचे विसर्जन, 9 ऑक्टोंबर रोजी कोजागिरी पोर्णिमा आणि ईद ए बिलार आदी सण साजरे होत आहेत. या विविध धार्मिक उत्सवाच्या काळात नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक नागरीक शांतता व सलोख्याला नेहमीप्रमाणे प्राधान्य देऊन परस्पराचा आनंद द्विगुणीत करतील असा विश्वास जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी व्यक्त केला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, शांतता समितीचे सन्माननिय सदस्य श्रीमती साखरकर, भदन्त पय्या बोधी, मौलाना आयुब खासमी दुष्यंत सोनाळे, शरणसिंघ सोडी, पुनिता रावत, निळकंठ मदने, हारिश ठक्कर, महंमद सरफराज अहमद, सारंग नेरलकर, संतबाबा बलविंदर सिंघ यांचे प्रतिनिधी व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.

या उत्सव काळात पथदिवे, स्वच्छता, आरोग्य, औषधांची उपलब्धी व इतर पायाभूत सेवा तत्पर ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी केल्या. या काळात मिठाई, मावा व दुग्धजन्य पदार्थ यात भेसळ झाल्यास सरळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो हे लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सर्व खाद्य पदार्थ विक्रेत्यांना योग्य ते आदेश देण्याचेही त्यांनी सांगितले. मिरवणुकीसाठी वापरली जाणारी वाहने ही सुस्थितीतच असली पाहिजेत. ही वापरण्यात येणारी वाहने यांचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. 

गणेश उत्सवात दाखविलेला संयमीपणा कौतुकास्पद - जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे
कायदा व सुव्यवस्था याची काळजी घेऊन हे सर्व उत्सव नागरिकांनी आनंदात साजरे केली पाहिजेत. यात कायदा व सुव्यवस्थेला कोणी बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले. यापूर्वी पार पडलेल्या विविध उत्सवात जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यंत समजदार भूमिका घेतली आहे. धार्मिक स्थळांना कोणतेही अधिकचे कुंपन न घालता अतिशय शांततेत गणेश उत्सव साजरा करून नांदेड जिल्हा वासियांनी वेगळा शांततेचा संदेश दिला या शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेडकवासियांचा गौरव केला. डिजे वापरण्यास बंदी आहे. याचा जर कुठे वापर होत असेल त्यांच्या विरुद्ध व ही यंत्रणा हाताळणाऱ्या व्यक्ती विरुद्ध आम्ही कठोर कारवाई करू या शब्दात त्यांनी इशाराही दिला. संपूर्ण पोलीस यंत्रणा दक्ष असून यात जर कोणी जाणीवपूर्वक शांततेला आव्हान निर्माण करत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई अटळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

गरबासाठी जाताना पालकांनाही मुलींची हवी माहिती - श्रीमती साखरकर
गरबासाठी घरातून बाहेर पडतांना मुली नेमक्या कुठे चालल्या आहेत याची माहिती पालकांनाही आवश्यक आहे. याबाबत पालकांनी अधिक जबाबदार भूमिका घेऊन मुलींकडून ही सर्व माहिती घेऊन ठेवली पाहिजे. याचबरोबर वेळेची बंधन काटेकोर पाळून स्वत:ही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन सदस्य श्रीमती साखरकर यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी