मेळगांवच्या 'त्या' ग्रामसेवकाची पाठराखण नायगांवच्या गटविकास अधिकाऱ्यांना भोवली ! -NNL

२४ तासात खुलासा सादर करण्याचे जिल्हा परिषदेच्या उपमुकाअ यांचे आदेश ; सरपंचासह ४ सदस्यांचे उपोषण स्थगित


नांदेड| 
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधिकार प्रदान केल्यानंतरही  नायगांव तालुक्यातील बहुचर्चित मेळगांव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन दोषी ग्रामसेवक श्री.एन.एस यरसनवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण केल्याचा ठपका ठेवून नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांना आपल्याविरोधात प्रशासकीय कार्यवाहीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे का प्रस्तावित करु नये? याबाबतचा खुलासा २४ तासांच्या आत सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधिर ठोंबरे यांनी दिले असून सदर प्रकरणात पाच दिवसात दोषींविरुद्ध कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर सरपंच मोहन धसाडे यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या कार्यालयासमोरील आपले आमरण उपोषण आज स्थगित केले.   

मेळगांव ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक श्री.एन.एस यरसनवार यांनी आपल्या कार्यकाळात सरपंच मोहन धसाडे यांच्या कोरे चेकबुकवर तसेच,त्यांच्यासह तब्बल ४ ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक व ग्रामसभांच्या कोऱ्याच रजीस्टरवर स्वाक्षरी घेतल्या होत्या व अनेकदा विनंतीनंतरही या सभांचे विषय व ईतिवृत्त दिले नाहीत तसेच,विविध योजनानिहाय कामे हस्तकांकडून दर्जाहीन आणि कागदोपत्रीच पूर्ण करुन घेत होते. सोबतच, स्थानिक ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले होते.अशा एक ना अनेक बाबींवर त्यांच्या विरोधात तक्रारीनंतर तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून याबाबत सात दिवसांत चौकशीसह कार्यवाहीचे आश्वासन देऊन संबंधित ग्रामसेवकाची बदली करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांना संबधित तत्कालीन ग्रामसेवकाने त्यांच्या कार्यकाळातील अभिलेखे व दस्ताऐवज चौकशीसाठी सादर केलेच नाहीत मात्र तरिही सद्या कार्यरत गटविकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी कागदोपत्रीच सोपस्कार पूर्ण करीत त्यांची पाठराखण करुन सद्या कार्यरत कर्तव्यतत्पर ग्रामसेवक वाय.एच.सुर्यवंशी यांचीच नियमबाह्यपणे बदली करण्याचा प्रयत्न अनेकदा केला.

संबधित तत्कालीन दोषी ग्रामसेवक यरसनवार यांच्यासह त्यांची पाठराखण करुन स्वतःच्या आर्थिक हितासाठी जातियद्वेषातून आपणांस मानसिक त्रास देत असल्याने  गटविकास अधिकारी वाजे व पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी शेख लतिफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करा वा त्यासाठी आपल्या वरिष्ठांसह मा.सक्षम न्यायालयात दाद मागण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी सरपंच मोहन धसाडे यांच्यासह गंगाधर कंदरवाड,माधव शिंदे व सौ.भारतबाई महिपाळे या ग्रामपंचायत सदस्यांनी आज जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केल्यानंतर गटविकास अधिकारी एल.आर.वाजे यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जावक क्रमांक ९८१ दि.१४ सप्टेंबर १९ अन्वये दिलेल्या आदेशात अधिकार प्रदान केल्यानंतरही त्यानुसार सदर प्रकरणात कार्यवाही केली नसल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे का प्रस्तावित करु नये? याबाबतचा खुलासा २४ तासात सादर करावा असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधिर ठोंबरे यांनी दिले असून विहित कालमर्यादेत खुलासा सादर न केल्यास वा असमाधानकारक खुलासा प्राप्त झाल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट करतांनाच या प्रकरणात संबधित गटविकास अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला असून अहवाल प्राप्त करून घेऊन पाच दिवसात दोषींविरुद्ध कारवाई करु असे लेखी आश्वासन सरपंच धसाडे यांना दिल्यानंतर त्यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर सुरु केलेले आमरण उपोषण स्थगित केले.यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे सहा.गटविकास अधिकारी निलेश बंगाळे व मंगेश ढेंबरे उपस्थित होते.

दरम्यान बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते ॲड.बाळु उर्फ प्रमोद नरवाडे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा,नायगांव तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा. भवरे,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण कदम,भाजपाचे युवानेते शंकर तमनबोईनवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष पंकज कांबळे,सामाजिक कार्यकर्ते किरण वाघमारे, माजी उपसरपंच प्रल्हाद पवार,साहेबराव धसाडे आदींसह विविध सामाजिक संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त करुन सरपंच धसाडे व सहकारी यांच्या न्यायिक मागण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष देऊन दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

..अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला जाग !


महत्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच मोहन धसाडे यांनी सदर प्रकरणात केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन या प्रकरणात अनुक्रमे राज्याच्या ग्रामविकास व महसूल विभागाला योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले होते.परंतू,आजपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने दोषींसह त्यांची पाठराखण करणारेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास विलंब लावला होता.सरपंच धसाडे यांनी लोकशाहीमार्गाने उपोषणाचा पावित्रा घेतल्यानंतर जि.प.प्रशासनाने जागे होत उशीरा का असेना कार्यवाहीला सुरुवात केली असली तरिही या प्रकरणात त्यांच्याकडून निश्चित कारवाई होईल का ? अशा एक ना अनेक चर्चा  होत असून येत्या काही दिवसातच याबाबतचे चित्र स्पष्ट दिसून येईल मात्र पाच दिवसात दोषींविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही तर, संबंधितांच्या वरिष्ठांसह मा.सक्षम न्यायालयात दाद मागणार असल्याचे सरपंच धसाडे म्हणाले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी