स्मार्टवर्क मधून अधिकाऱ्यांनी आपली ओळख निर्माण करावी - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे -NNL


नांदेड|
स्मार्टवर्क मधून अधिकाऱ्यांनी आपली ओळख निर्माण करावी. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यासाठी समन्वयाने कामे करावीत, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

आज गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती बैठक संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, नारायण मिसाळ, रेखा काळम- कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा कृषी अधिकारी टी.जी. चिमणशेट्टे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय चौधरी, डॉ. अरविंद गायकवाड यांच्‍यासह गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, तालुका आरोग्‍य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, अधिकारी व कर्मचा-यांनी विविध लाभाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन, आराखडे व अंमलबजावणी करावी. आर्थिक वर्षातील कोणत्‍याही योजनेचा निधी परत जाणार नाही याची खबरदारी घेऊन, वेळेत कामे पूर्ण करावीत असेही त्या म्हणाल्या. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्‍त अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने आदेशित केल्‍यानुसार जिल्‍हयात वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागाने याचे नियोजन करून कार्यक्रम पत्रिका जाहीर करावी, त्यानुसार गावागावातून कार्यक्रम राबविण्यात यावेत. 

सध्या राष्ट्रीय पोषण महा राबविण्यात येत आहे, या उपक्रमात लोकांचा सहभाग घ्यावा. पशुमधील लंम्‍पी स्कीप डिसेसला आळा घालण्यासाठी गावनिहाय सर्वे करून प्रतिबंधात्मक उपाय करण्‍यावर भर द्यावा. दिनांक 15 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याची प्रभावी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, समाजकल्याण, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, महिला व बालकल्याण विकास आदी विभागांचा सविस्तर आढावा घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी