विष्णुपूरी येथे लंपी आजार प्रतिबंध लसीकरण संपन्न -NNL


नवीन नांदेड।
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग , जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, नांदेड व ग्रामपंचायत विष्णुपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 सप्टेंबर रोजी विष्णुपूरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात लंपी आजार प्रतिबंध लसीकरण मोहिम यशस्वीपणे संपन्न झाली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण नांदेडचे आमदार मोहनराव मारोतराव हंबर्डे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मधुसूदन रत्नपारखे,सरपंच सौ.संध्या विलासराव देशमुख, उपसरपंच सौ.अर्चना विश्वनाथराव हंबर्डे, विलास आबासाहेब देशमुख,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूपेंद्र बोधनकर,तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार,विश्वनाथ हंबर्डे, ग्रामविकास अधिकारी संजय कानोडे व पशुधनहितचिंतक राजेश हंबर्डे यांची उपस्थिती लाभली होती. 

प्रथम  डॉ. अविनाश बुन्नावार यांनी लंपी आजाराविषयी सविस्तर माहिती देवून हा आजार जनावरांना सहजासहजी होत नसून स्वच्छता अभावी याची लागण होते आणि शेतकरी बंधूंनी जागृतपणे या आजाराविषयी माहिती घेवून काळजी घेतल्यास हा आजार जनावरांना होणारच नाही, असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय समारोप मार्गदर्शनातून आमदार मोहनराव हंबर्डे यांनी या आजाराची मुख्य तीन कारणे सांगतांना असे कथन केले की, जनावरांचा गोठा स्वच्छता मोहीम व्यापकपणे राबविणे,पशुंना दररोज उन्हात एक ते दोन तास बांधून व्हिटॅमिन डी मिळू देणे तथा लंपी आजार प्रतिबंध लसीकरण तात्काळ करुन घेणे. काही समस्या आल्यास ताबडतोब संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या समस्येवर तोडगा काढावा,असे मोलाचे मार्गदर्शन केले. 

या समयी प्रातिनिधिक स्वरुपात आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते एका गायीचे पुजन करुन लंपी आजार प्रतिबंध लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित अनेक शेतकरी बांधवांच्या शंकेचे व समस्येचे निराकरण करण्यात आले. अत्यंत उत्साहात दिवसभरात सातशे सदतीस गाय,बैल व चार महिन्यावरील वासरांचे गोटपाँक्स लस देवून लसीकरण करण्यात आले. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी विलास भोसले,बालाजी हंबर्डे, लक्ष्मणराव हंबर्डे, तातेराव भोसले,पशुधन पर्यवेक्षक डॉ. गजानन मठपती, डॉ. बी.डी.हनुमंते,सेवादाता म्हणून डॉ. सुनील येवले,डॉ.पांडुरंग मेने,संतोष हंबर्डे व उग्रसेन हंबर्डे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी