शाळा' ही कादंबरी संवेदनशील मनाने लिहिलेली असून ती सजकतेने समजून घ्यावी लागेल - प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांचे उद्गार -NNL


नायगाव/नांदेड।
भोवतालचे वातावरण पार बिघडून गेले आहे. या वातावरणाच्या वावटळीत स्वतः लेखकही सापडलेला आहे. तोही या अवकाशात गिरक्या घेत आहे. परंतु तो सजग आहे.. आणि ही सजगता ठेवूनच सर्व अनुभवांची आणि जाणिवांची- संवेदनाची जंत्री एकत्रित करीत 'शाळा' ही कादंबरी लेखक ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांनी आपल्या हाती दिली आहे. ती आता आपणाला तेवढ्याच सजगतेने समजून घ्यावी लागेल असे उद्गार प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बिरादार यांनी काढले.

ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांच्या 'शाळा' या कादंबरीचा प्रकाशन समारंभ नायगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक देवीदास फुलारी हे होते तर तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबू बिरादार, शंकर वाडेवाले, केशवराव पाटील चव्हाण, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, माधवअप्पा बेळगे, गटशिक्षणाधिकारी मोहनराव कदम हे उपस्थित होते.
     
प्रारंभी ग्रंथपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते 'शाळा' कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. यानंतर लेखक ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांनी मनोगतातून शासनाने शिक्षकांपुढील समस्यांचा डोंगर हटवावा आणि त्यांना विद्यार्थ्यांना घडवू द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
     
बाबू बिरादार पुढे म्हणाले की, शैक्षणिक विश्वाला कादंबरीचे स्वरूप दिल्यामुळे एक नवीन विश्व साहित्यात आले आहे. त्यामुळेही ही कादंबरी महत्त्वपूर्ण ठरते. ग्रंथलेखन करीत असतानाची मनस्थिती सांगणे कठीण असते. महत्त्वाचा विषय उत्तम प्रकारे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत असेही ते म्हणाले.
     
देवीदास फुलारी म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील आजची बिघडलेली परिस्थिती सुधारावी याची तळमळ या लेखकास आहे. यातील पात्रेही छान रंगविली आहेत. 'शाळा' कादंबरी वाचताना आजूबाजूलाच हे घडते आहे असे वाटते. कादंबरीसाठी लेखकाने परिश्रम घेतले आहेत. आपण स्वतःही या परिस्थितीत अडकलो आहोत हे माहीत असूनही हा लेखक त्यावेळेस शांत राहतो व अंतरातील एका सज्जन व्यक्तीची तळमळ नंतर विधायक मार्गाने व्यक्त करतो हे त्यांचे मोठेपण होय असे त्यांनी म्हटले.
     
शंकर वाडेवाले यांनी कादंबरी वाङ्मय प्रकाराचा आढावा घेऊन शिक्षण क्षेत्रातील एक उत्तम कादंबरी म्हणजे ज्ञानेश्वर शिंदे यांची 'शाळा' होय असे म्हटले. भाषेच्या सामर्थ्यामळे कादंबरीचे भाषावैभव वाढले आहे. सर्वांच्याच जीवनाशी निगडित ही कादंबरी असल्याने सर्वांनी सजगतेने वाचावी असेही म्हटले. शिवराज पाटील होटाळकर यांनी शिक्षण विभागाला चांगले स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न होता व राहील असे सांगून त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. मोहनराव कदम यांनीही यावेळी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रसंगानुरूप कोट्या करत कवी वीरभद्र मिरेवाड यांनी केले तर आभार अविनाश कोल्हे यांनी मानले.
     
समारंभाला शं. ल. नाईक, लक्ष्मण मलगिरवार, नारायण शिंदे, बाळू दुगडूमवार, विजयकुमार चित्तरवाड, नागोराव उतकर, पंडित पाटील, आनंद रेनगुंटवार, सोपान देगावकर,बाळासाहेब पांडे, गजानन चौधरी, गंगाधर गंगासागरे, हणमंत चंदनकर, रविंद्र भालेराव,प्रा.डाॅ.जीवन चव्हाण, व्यंकट आनेराये, बालाजी पेटेकर,  भास्कर शिंदे, पांडुरंग पुठ्ठेवाड, सरोज शिंपाळे, भाऊराव मोरे, भाऊसाहेब वडजे,माधवराव शिंदे, विठ्ठल बेळगे, गोविंद शिंदे, साईनाथ चव्हाण, अविनाश कदम, सौ.माया चव्हाण, सौ.विद्या वडजे,अरूण कदम, प्राचार्य मिरकुटे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी