पितरांच्या शांतीसाठी विविध देशांमध्ये करण्यात येणार्‍या पारंपरिक कृती -NNL


प्रस्तावना - श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. ‘पितृपक्षात ‘श्राद्ध-पिंडदान’ हे पितृऋण फेडण्याचे एक माध्यम आहे. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते.

पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संकल्पना केवळ भारतातच नाही, तर विदेशांतही पितरांच्या शांतीसाठी विविध पारंपरिक कृती करण्यात येतात. त्यांत पूर्वजांच्या मुक्तीसाठीची शास्त्रोक्त संकल्पना नसली, तरी किमान ‘पूर्वजांविषयी कृतज्ञ रहायला हवे’, एवढी भावना तर निश्‍चितच असते. तसेच विदेशात अन्य पंथांत जन्मलेले अनेक पाश्‍चिमात्य त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, या हेतूने भारतात येऊन पिंडदान आणि तर्पण विधी करतात.त्यामुळे श्राद्धविधींवर टीका करणार्‍यांना उत्तर देता यावे,यासाठी माहिती देणारा अभ्यासपूर्ण लेख !


अन्य पंथांमध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी केल्या जाणार्‍या पारंपरिक कृती !


पारशी पंथ - पारशी बांधवांच्या ‘पतेती’ या मुख्य सणानिमित्त वर्षातील शेवटचे 9 दिवस हे पितरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात. दहाव्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. ‘पतेती’ म्हणजे पापातून मुक्त होण्याचा दिवस ! ‘पापेती’ म्हणजे पापाचे नाश करणारा दिवस. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन ‘पतेती’ असा झाल्याचे जाणकार सांगतात. साधारणपणे ऑगस्ट मासात हा कालावधी येतो.


कॅथोलिक पंथ - अमेरिका, लॅटीन अमेरिका आणि युरोप यांतील अनेक देशांमध्ये नोव्हेंबर मासात पितरांना तृप्त करण्याची प्रथा आहे. हा पूर्वजांच्या आत्म्याशी संबंधित दिवस असला, तरी त्याला उत्सवाप्रमाणे साजरा करण्याची प्रथा आहे. 31 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून ते 2 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यात 31 ऑक्टोबरच्या सायंकाळी ‘हॅलोवीन यात्रा’ काढली जाते. 1 नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सेंट्स डे’ (सर्व संत दिन), तर 2 नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सोल्स डे’ (सर्व आत्मा दिन) असतो. या काळाला ‘हॅलो मास’ म्हणजेच ‘पवित्र काळ’ असेही म्हटले जाते.


बौद्ध पंथ -  चीनच्या बुद्धीस्ट आणि ताओ परंपरेनुसार चिनी दिनदर्शिकेच्या 7 व्या मासातील 15 व्या दिवशी पूर्वजांच्या संदर्भात ‘घोस्ट फेस्टिव्हल’ (भूतांचा/मृतांचा उत्सव) किंवा ‘युलान फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. ऑगस्ट ते सप्टेंबर मासाच्या कालावधीत हा दिवस येतो. या 7 व्या मासाला ‘घोस्ट मास’ (भूतांचा/मृतांचा मास) म्हणून ओळखले जाते. या काळात ‘स्वर्गातील, तसेच नरकातील पूर्वजांचे आत्मे भूतलावर येतात’, अशी तेथील मान्यता आहे. या काळात पूर्वजांना दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातात. 


विदेशातील विविध देशांत पूर्वजांच्या आत्म्यासाठी केल्या जाणार्‍या पारंपरिक कृती


बेल्जियम :2  नोव्हेंबर या दिवशी ‘ऑल सोल्स डे’च्या दिवशी सुटी नसल्याने आदल्या दिवशी म्हणजे ‘ऑल सेंट्स डे’च्या दिवशी दफनभूमीत जाऊन प्रार्थना करतात, तसेच मृताम्यांच्या कबरीवर दिवा लावला जातो.


पोर्तुगाल : 2 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण परिवारासह दफनभूमीत जाऊन प्रार्थना केली जाते.


जर्मनी : जर्मनीमध्ये कबरींची रंगरंगोटी केली जाते, भूमीवर कोळसा पसरवून त्यावर लाल रंगाच्या बोरांनी चित्र काढले जाते आणि कबरींना फुले अन् कळ्या यांच्या माळांनी सजवले जाते.


फ्रान्स : फ्रान्समध्ये चर्चच्या रात्रकालीन प्रार्थनेच्या शेवटी लोकांनी त्यांच्या पितरांच्या संदर्भात चर्चा करणे आवश्यक समजले जाते.


मेक्सिको : या देशात याला ‘मृतांचा दिन’ म्हणून ओळखले जाते. याला स्थानिक भाषेत ‘अल् देओ दे लॉस मुर्तोस’ असे नाव आहे. 


चीन : चीनच्या ‘हान’ परंपरेनुसार गेल्या २ सहस्र ५०० वर्षांपासून ‘क्विंगमिंग’ किंवा ‘चिंग मिंग’ उत्सव पूर्वजांच्या स्मरणार्थ केला जातो.या उत्सवाच्या निमित्ताने पूर्वजांच्या थडग्याची स्वच्छता केली जाते. तेथे पूर्वजांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ ठेवणे, सुगंधी अगरबत्ती लावणे, तसेच ‘जॉस पेपर’ जाळणे, अशा कृती केल्या जातात. हा उत्सव चीन, तैवान, मलेशिया, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया या देशांतही साजरा केला जातो.


जपान : जपानमध्ये याला ‘बॉन फेस्टिव्हल’ म्हणून ओळखले जाते. ‘बुद्धीस्ट-कन्फ्युशियस’ परंपरेत हा पूर्वजांच्या सन्मानाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. याविषयी मान्यता आहे की, या काळात पूर्वजांचे आत्मे मूळ घरातील पूजास्थानी येतात. त्यामुळे संपूर्ण परिवार मूळ घरी जमतो आणि पूर्वजांची थडगी स्वच्छ करून तेथे धूपबत्ती लावतात.


सुवर्णदानापेक्षा आपल्या पितरांसाठी पिंडदान, अन्नदान आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिक आहे !

मार्च 2010 मध्ये रशियन साम्यवादी नेत्या साझी उमालातोवा यांनी रशियाचे माजी राष्ट्रपती बोरिस येल्तसिन यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भारतात तर्पण आणि पिंडदान केले होते. त्यानंतर उमालातोवा भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांमुळे इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी वैदिक धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलॉन यांना त्यांच्या मृत मुलाच्या आत्म्याची सतत जाणीव होत होती. त्यामुळे त्यांनी मुलाच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी संपूर्ण कुटुंबाला भारतात पाठवून हरिद्वार येथे पिंडदान आणि श्राद्ध विधी करवून घेतले. विविध पंथांच्या, तसेच अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील अनेक देशांमधील उदाहरणांमधून प्रत्येक ठिकाणी पूर्वजांचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच सर्व ठिकाणी हा कालावधी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत असतो, हेही स्पष्ट होते. विशेष म्हणजे भारतातही पितृपक्षाचा आश्‍विन मास जवळपास (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) याच काळात येतो.

       

सध्या विदेशातील प्रगत देशांत बहुतांश (60  ते 80 टक्के) लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. अमेरिकेतही पाच व्यक्तींपैकी एका व्यक्तीला मानसिक आजार आहे, तर त्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील; परंतु आध्यात्मिक देशात त्यांचे प्रमाण अल्प का, याचा अभ्यास का केला जात नाही ? केवळ आधुनिक विज्ञान आणि भौतिक प्रगती यांच्या आधारे सर्व समस्यांवर उपाय मिळत नाही. याच कारणामुळे गया (बिहार) या तीर्थक्षेत्री अनेक विदेशी नागरिक श्राद्ध-पिंडदान, तर्पण आदी करण्यासाठी येतात. यातून पूर्वजांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध केल्याविषयी हिंदु धर्मावरच टीका करणार्‍यांचा हिंदुद्वेष स्पष्ट होतो.


संकलक : श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

संपर्क : 99879 66666


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी