13 ते 19 वयोगटातील मुलींच्या पोषणावर अधिक लक्ष देण्याची गरज - जिल्हाधिकारी अभिजित राऊत -NNL

किनवट येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे निर्देश 


किनवट, माधव सूर्यवंशी|
जिल्ह्यातील किनवट, माहूर व आजुबाजुच्या आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याचे प्रश्न अधिक महत्वाचे आहेत. यात प्रामुख्याने वय वर्षे 13 ते 19 या वयोगटातील मुलींच्या आरोग्यावर, त्यांच्या पोषणावर अधिक लक्ष दिल्यास त्यांना सुदृढ व निरोगी होण्यास वेळ लागणार नाही. याच मुली भविष्यात आपल्या सुदृढ बाळाला जन्म देऊन कुपोषणाचे आव्हान परतून लावतील, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या व आरोग्य विषयक योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   

राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाण अत्यल्प जरी असले तरी महिलांच्या आरोग्याचा विशेषत: मुलींच्या कुपोषणाचा सातत्याने लक्ष द्यावा लागणारा प्रश्न आहे. 13 ते 19 या वयोगटातील मुलींमध्ये असलेला अशक्तपणा हा नजरेआड करता येणार नाही. सद्यस्थितीत कुपोषीत माता व बालकांसाठी जिल्ह्यात एकच पोषण पुनर्वसन केंद्र आहे. आदिवासी भागासाठी याच धर्तीवर किनवट येथे नवीन पोषण पुनर्वसन केंद्र चालू करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. प्राथमिक स्तरावर या विषयाला प्राधान्याने किनवट, माहूर या दोन तालुक्यावर लक्ष केंद्रित करून टप्याटप्याने संपूर्ण जिल्हाभर त्याचा विस्तार करू असेही त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी या बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गाभा समिती, लसीकरण, कोविड लसीकरण, क्लायमेट चेंज व इतर अनुषांगिक आरोग्याच्या योजनांबाबत माहिती सादर केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी