महाराष्ट्र इन्नोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित “महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह - 2022” च्या विजेत्यांचा भव्य सन्मान सोहळा -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे महाराष्ट्र इन्नोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित “महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह  - 2022” च्या विजेत्यांचा भव्य सन्मान सोहळा काल  दि. 16  ऑक्टोबर रोजी मुम्बई येथे राजभवनात पार पडला. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेटट्राइब ह्या आयटी कंपनीचे संचालक सारंग वाकोडीकर ह्यांना “इ-प्रशासन” ह्या विभागामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन गतिमान करण्यासाठी इ-प्रशासन ह्या प्रकारामध्ये सेटट्राइबचे संचालक सारंग वाकोडीकर ह्यांना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आल्यामुळे किनवटसारख्या दुर्गम आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पदार्पन करण्यासाठीचा पाया भक्कम होईल असे चित्र निर्माण झाले आहे. 1 लक्ष रुपयांचे रोख बक्षीस, पेटंट सहाय्य, सॉफ्टवेअर क्रेडिट, क्लाउड क्रेडिट, मान्यवरांचे मार्गदर्शन, इंक्युबेशन सहाय्य असे  बक्षिसाचे स्वरूप आहे.

पुणे, मुम्बई, बॅंगलोर अश्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी जाण्यापेक्षा त्यांच्या मुळ गावानजिकच त्यांना आयटी हब उपलब्ध करून देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा  ज्ञानयज्ञ अविरत चालू राहील व राज्यपालांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार आम्हाला एक  नवीन उर्जा देवून जाईल असे पुरस्कारार्थी सारंग वाकोडीकर म्हणाले. हे पारितोषिक जरी प्रातिनिधीक स्वरूपात मला मिळाले असले तरिही हा सेटट्राइब मध्ये सॉफ्टवेअर तयार करणार्‍या विद्यार्थ्यांचा व इंटर्न्सचा गौरव असल्याने ह्या इंटर्न्सचे व त्यांच्या पालकांचे सारंग वाकोडीकर ह्यांनी अभिनंदन केले आहे. 

सेटट्राइबला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहाय्य करणारे आय ए एस  अधिकारी, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, सेटट्राइबचे विद्यार्थी, इंटर्न्स, पालक ह्यांचा ह्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे असेही वाकोडीकर म्हणाले. जालना जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री विजय राठोड, जिल्हा परिषद जालनाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री विवेक खतगावकर, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे ह्यांचे वाकोडीकर ह्यांनी आभार व्यक्त केले आहे.

गेल्या 3 वर्षांपासून किनवट येथील सेटट्राईब ह्या संस्थेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनेक सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करून त्या 10हुन अधिक जिह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये आस्थापित केल्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये असलेल्या 15हुन अधिक आय ए एस अधिकार्‍यांनी सेटट्राइब द्वारे तयार केलेल्या सॉफ्टवेअर ना पसंती देवून त्यांचा स्विकार केला हे उल्लेखनीय.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी