संकटग्रस्त बळिराजाचा पोषिंदा कोण..? -NNL


आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. औद्यागगिक क्षेत्राबरोबरच कृषि क्षेत्राचे योगदान हे आपल्या देशाच्या विकासामध्ये मोलाचे आहे. एवढेच नाही तर आधुनिक  तंत्रानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात औद्योगिक चिकासाच्या माध्यमातुन देशाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत असली तरी कृषि क्षेत्राचे त्या तुलनेत योगदान कमी मानता येणार नाही. ग्रामीण भागाच्या रोजगाराचा कणा हा आजही शेतीच आहे. भारतातील कोट्यावधी जनतेची अन्नाची भूक भागवून परदेशात मोठ्या प्रमाणात धान्य आपण निर्यात करतो आणि त्यापासून मोठ्या प्रमाणात परकिय चलन मिळवून त्याचा देशाच्या विकासामध्ये वापर केला जातो. 

म्हणून कृषि क्षेत्र आणि त्यामध्ये रात्रंदिवस काम करणारा शेतकरी हा घटक देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. एवढेच नाही तर सर्व देशवासीयांची अन्नधान्याची गरज भागवणारा शेतकरी आणि शेतमजूर ह्या घटकांकडे संपूर्ण देश अतिशय आदराने पाहतो. देशाचा पोशिंदा म्हणून सर्वजन शेतकऱ्याना ओळखतात. परंतु हा देशाचा पोषिंदा आधुनिकतेच्या आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या काळामध्येही पारंपारिक पध्दतीने शेती करतो. शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. परंतू अल्पभूधारक आणि सर्वसामान्य शेतकऱ्याना हे तंत्रज्ञान परवडेना झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नांगरणी, कुळवणी, पेरणी, पिकातील अंतरमशागत, तन निवारण, किटकनाशक फवारणी ही आजही अंगमेहनत करुनच करावी लागत आहे. म्हणन शेतीवरील प्रत्यक्ष महिला पुरुषांच्या श्रमाला आजही पर्याय नाही असेच म्हणावे लागेल.

आपल्या देशातील शेती ही आजही निसर्गावरच अवलंबून आहे. शेतीमध्ये शाश्वत पाण्याची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्यानी केलेली नाही आणि मर्यादित उत्पन्नामुळे ते सर्व शेतकऱ्याना शक्यही नाही. निसर्ग नियमानुसारच आजही आपल्या देशातील शेती व्यवसाय करणे चालु आहे. पेरणीच्या काळात थोडासा पाऊस पडला कि, आता पाऊस पडत राहील या आशेवर शेतकरी आपल्या शेतीमध्ये महागामोलाचे खत बियाणे टाकुन पेरणी करतो आणि निसर्गाच्या आशेवर बसतो. कांही ठिकाणी पेरणीनंतर पाऊस पडतो तर कांही ठिकाणी उगवलेली मोडं पासाअभावी करपुन जातात. 

तर कांही भागात पेरणीनंतर अतिवृष्टी होवून लहान लहान मोड त्यात वाहुन जातात. त्यानंतर परत कर्जबारी होवून, दुबार, तीबार पेरणी शेतकरी करतो. मग पिक मोठे झाल्यानंतर दाना भरण्याच्या कालावधीत एखादे पाणी पडले नाही तर पुर्ण पिक करपुन जाते. महागामोलाचे बी-बियाणे, खते, किटकनाशके, तणनाकशके वापरुन लहान अंकुरापासून पिक हातात येईपर्यंत अगदी पोटच्या लेकराप्रमाणे जपतो. तसेच वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेतात दिवसा रात्री आपल्या जिवाची पर्वा न करता शेतकरी पिकांचे रक्षण करतात. एवढे करुनही  ऐन काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस होवून शेतकऱ्याची पिके नासुन, त्याला मोड फुटले आहेत. त्यामुळे आपल्या हातात काहीच नाही असे म्हणत अतिशय हतबल होवून शेतकरी आपल्या नशिबाला दोष देत आहे.

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतील हाताला आलेले सोयाबीन, कापूस, मुग, उडिद, मका, ज्वारी ही पिके अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातची गेली. काढणीला आलेले, काही ठिकाणी कापुन झालेले सोयाबीन अतिवृष्टीमुळे वाहुन गेले. एवढेच नाही तर कापुन ढिग मारुन ठेवलेले ढिगारे पाण्यात वाहुन गेल्याचे बघावयास मिळाले. सर्वच्या सर्व यावर्षी सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. शेतकरी या अतिवृष्टीच्या पावसामुळे पार मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टी झाल्यानंतरही कसेबसे पिक शेताबाहेर काढण्यासाठी आपल्या मुला बाळांना शेतामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने कापणी करताना शेतकऱ्यावर त्यांच्या मुलां-बाळांबवर विज कोसळून अनेकांचा मृत्यू झाल्याचे बघावयास मिळाले. शेतकऱ्यानी स्वतःच्या पेरलेले पिक मोठे झाल्यानंतर ते काढुन त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतकNयास करता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

अतिवृष्टीने संपुर्ण महाराष्ट्रात हाहाकार घालुन शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पळविला. आपल्या हातात काहीच राहीले नाही. ज्या पिकावर सर्व कुटुंबाच्या नियोजनाची स्वप्ने पाहिली होती ते पिकच निसर्गाने हिरावून घेतल्यानंतर हतबल झालेल्या शेतकऱ्याने शासनावर भिस्त ठेवली की आपणास आपल्या सरकारकडून या संकटातुन बाहेर काढले जाईल. आपल्या पिकाची नुकसान भरपाई शासनाकडून मिळेल तसेच आपण भरलेला पिकविमा आपल्याला मिळेल आणि त्यातुन काही प्रमाणात का होईना कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल. शेती पिकांची नासाडी, शेतकरी तसेच त्याच्या मुला-बाळांचा, गाई-म्हशींचा विज पडून झालेला मृत्यू, त्याच्या जनावरांचा मृत्यू, तसेच अनेक जनावरे पुरात वाहुन गेली, शेतातील सर्व पिके वाहुन, नासुन गेली. हे सर्व शासनास प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने जसेच्या तसे दाखवन्यात आले शासनानेही शेतकऱ्याचे विदारक, मन हेलावून टाकणारे चित्र बघितले आहे, बघत आहेत.

तरीही ताबडतोब त्याच्या खात्यावर पिक नासाडी, पिकविम्याची रक्कम टाकण्यास सरकार तयार नाही. कांही जिल्ह्यामध्ये ही नासाडीची रक्कम देण्यात आली ती बँक प्रशासनाच्या, महसुल प्रशासनाच्या दिरंगाईमुळे, स्थानिक नेते, गाव पुढारी यांच्या स्वार्थीपणामुळे ती रक्कम शेतकऱ्याच्या हातात पडताना दिसून येईना झाली आहे. दुःखातिरेकाने हतबल झालेला शेतकरी सर्वच मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे कसाविस झाला आहे. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत सापडला आहे. तरीही शासन आपली जबाबदारी ओळखून शेतकऱ्याच्या हक्काची रक्कम देण्यास दिरंगाई करत आहे.

दिवाळी, दसरा हा शेतकऱ्याचा आनंदाचा सण परंतु तिवृष्टीमुळे या सणावर दुःखाचे सावट पसरले आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी, दुःख, चिंता, हतबलता, लाचारी दिसून येत आहे. प्रत्येक नागरिकांच्या जिवीताची त्याच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी ही शासनाने घेणे गरजेचे असते. परंतु जगाच्या पोशिंद्याला मात्र नेहमीच शासनाकडून वाऱ्यावर सोडले जाते. नुकसानीचे पंचनामे करताना गावातील पुढारी कृषि विभागातील कर्मचाऱ्यासोबत राहतात आणि आपल्या मर्जितल्या नातेवाईक, आप्त स्वकियांची नावे सुरुवातीला यावीत म्हणून हे गावातील पुढारी प्रयत्न करत आहेत.

तसेच शासनाकडून आलेली नुकसान भरपाई जिल्हा मध्यवर्ती बँकेतुन आपले वजन वापरुन बँक कर्मचाऱ्याकडून आपल्या गावातील शेतकऱ्याचे पैसे गावात नेतात आणि त्या शेतकऱ्याकडून दलाली घेवून तर त्या मिळालेल्या रक्कमेतील काही रक्कम स्वतःकडे ठेवून वाटप करतात. आताही असेच होत असल्याचे नाकारता येत नाही. ज्यांची शेती खरडून गेली, पिके वाहुन गेली, जनावरे मृत्त पावली अशा खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे शासनाच्या यादीमध्ये नावे नसुन ज्यांचे नुकसाना झाले नाही अशांची नावे स्थानिक पातळीवर त्या यादीमध्ये समाविष्ट केल्याचे दिसून येते. हा पिडीत, अन्यायग्रस्त शेतकऱ्यासोबत अन्याय होत असल्याचे दिसून येते.

एकिकडे शेतकऱ्याला बळीराजा, जगाचा पोशिंदा म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर त्याला त्या संकटात सहकार्य करायचे नाही उलट त्याच्या पैशावर मजा मारायची हि विदारक अवस्था शासन,  अधिकारी,  पुढारी यांच्याकडून दिसून येते. संपूर्ण देशाला अन्नधान्य, दुध, भाजीपाला पुरवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र संकटाच्या काळी कोणीच वाली नसल्याचे सद्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. शेतकऱ्याबद्दल शासन-प्रशासनाने आणि पुढाऱ्यानी संवेदनशिलता दाखवून त्याला सर्वतोपरी मतद करण्याची गरज आहे. परंतु सद्य जगाचा पोशिंदा म्हणविल्या जाणाऱ्या शेतकऱ्याचा पोशिंदा कोण असे म्हणायची वेळ आली आहे.

...भैय्यासाहेब तुकाराम गोडबोले, रा. जवळा ता.  लोहा जि. नांदेड, मो.९०११६३३८७३ 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी