हिंगोली लोकसभा मतदार संघातील रेल्वेची अर्धवट राहिलेली कामे गतीमान करा - खा. हेमंत पाटील यांच्या रेल्वे विभागाच्या अधिकारी यांना सुचना -NNL


नांदेड/हिंगोली|
दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विकासाच्या दृष्टीने रेल्वे रुंदीकरण, अंडर ब्रिज, रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला देणे अशी कामे हाती घेतली आहे. मात्र ती कामे अद्यापही पूर्णत्वास आली नाहीत. त्यामुळे रेल्वे विभागाकडून अतिशय संथ गतीने कामे असल्याचा सामान्य शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. हे लक्षात घेऊन रेल्वे विभागाने नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातील विकासकामे तात्काळ मार्गी लावावीत अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

खासदार हेमंत पाटील यांच्या तुकाई निवासस्थानी गुरुवारी (दि.२७) रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर उपिंदर सिंग, असिस्टंट डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर आर.के.मीना, सिनिअर डिव्हिजनल इंजिनिअर मूर्तीजी, जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना म्हणाले की, नांदेड, मुदखेड, किनवट, आदिलाबाद हा १६५ किलो मीटरचा लोहमार्ग आहे. या मार्गावर मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट आणि नांदेड अशी पाच तहसिल कार्यालय आहेत. पुढे हाच मार्ग तेलंगणातील आदिलाबाद  हून विदर्भातून मांजरी रेल्वे व चंद्रपूर, नागपुर या ब्राँडगेज मार्गास मिळतो. परंतु या मार्गावर अनेक ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. 

नांदेड जिल्ह्यातील श्री रेणूका माता प्रसिद्ध तीर्थस्थळ, दत्तप्रभू मंदीर, सहस्त्रकुंड, उनकेश्वर या सारखे अनेक प्रसिद्ध तीर्थस्थळे आहेत. परंतू भाविकांना त्या ठिकाणावर सहज पोहचता येईल अशा रेल्वे विभागाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात व त्यासाठी  मुंबई - तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडी किनवट आदिलाबाद  रेल्वे स्थानकाहून सुरु करावी. पनवेल - नांदेड पनवेल रेल्वे गाडीचा विस्तार किनवट - आदिलाबाद, किनवट - औरंगाबाद पॅसेंजर गाडी सुरु करावी, किनवट रेल्वे स्टेशन गेट क्र. १२ रेल्वे क्राँसिंग भूमार्ग तयार करावा, हिंगोली येथुन मुंबईला, ठाणे, नाशिक, औरंगाबाद साठी सोडण्यात आलेली अजनी लोकमान्य टिळक टर्मिनल साप्ताहीक एक्सप्रेस व पुणे येथे जाण्यासाठी अमरावती - पुणे ही साप्ताहीक एक्सप्रेस सध्या बंद आहे. 

त्यामुळे हिंगोली, वसमत, वाशिम सारख्या भागातील सामान्य जनतेसह विद्यार्थ्यांना मोठा अर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यांचे होणारे हाल तात्काळ थांबवून वरील दोन्ही साप्ताहीक रेल्वे गाड्या पुन्हा नव्याने सुरु कराव्यात. विशेष म्हणजे रेल्वे रुंदीकरणामुळे अनेक लहान मोठ्या गावाच्या मार्गात अंडर ब्रिज तयार केले जात आहेत. परंतू मागील तीन चार वर्षापासून अनेक ठिकाणची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात थोडा जरी पाऊस झाला तरी, शेतीवर जाणाऱ्या नागरीकांना मात्र रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे शेतीवर जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा ही अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकारी यांना दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी