धर्माबाद, बिलोली, माहूर, लोहा, भोकर, हिमायतनगर तालुक्यातील गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित - लम्पी आजाराबाबत जिल्हा प्रशासन दक्ष -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली बिलोली तालुक्यातील आरळी, बावलगाव तसेच माहूर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. 

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चोंडी, कारेगाव बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, कांगठी, भोसी तसेच लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीजची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहुर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील़ कलंबर, भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डीसीजची लक्षणे आढळून आली आहेत. 

भारत सरकारचा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.  याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त व बाधीत झालेली धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहुर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील़ कलंबर, भोकर तालुक्यातीलनांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. 

या परिसरातील गावांमध्ये बाधीत जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. बाधीत गावामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगानेग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी, रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, लम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे.  

कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचेविरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे. तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व खाजगी पदविकाधारकांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात यावा. खाजगी पदविकाधारकांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी लम्पी स्किन रोगांच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधी वरिष्ठांशी चर्चा करुन उपलब्ध करुन घ्याव्यात, असेही आदेशात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी