आमचे सरकार गोरगरीब, कष्टकरी जनता व शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्यास कटिबद्ध - खा.डॉ.श्रीकांत शिंदे -NNL

भव्य रॅली द्वारे मान्यवरांसह माता भगिनी कार्यक्रम स्थळी दाखल 


कळमनुरी/
हिंगोली| जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आ.संतोष बांगर यांनी खा.श्रीकांत शिंदे, हिंगोली जिल्हा पालकमंत्री तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेब, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, आ.संजय रायमूलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवर येताच भव्य रॅली द्वारे मोठ्या उत्साहात कार्यक्रम स्थळी पोचले या रैलीने कळमनुरी शहर परिसरात झालेल्या गर्दीमुळे भाऊबीजेला मोठ्या प्रमाणात बंडू भगिनी उपस्थित झाले. यावेळी "संत सेवालाल महाराज की जय","रामराव बापू महाराज की जय", "शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो" अश्या घोषणांनी कळमनुरी शहर दणाणून गेले. शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे म्हणूनच इतक्या प्रचंड संख्येने माता भगिनी या भाऊबीज कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या आहेत, आम्ही गोरगरीब, कष्टकरी जनता व शेतकऱ्यांच्या व्यथा दूर करण्यास कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन खा.डॉ श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित जनसमुदाया समोर केले. निव्वळ फोटोसेशनसाठी 20 मिनिटांचे दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार आहेत का..? असा टोलाही खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांची नाव न घेता लगावला.

कळमनुरी येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री रामचंद्र सात महाराज मंदिर परिसरामध्ये हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपावली निमित्ताने भाऊबीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खा.श्रीकांत शिंदे, हिंगोली जिल्हा पालकमंत्री तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, आ.संजय रायमूलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माता भगिनींसाठी भव्य भाऊबीज कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तत्पूर्वी भाऊबीज कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व माता-भगिनी व इतर मान्यवरांनी जिल्हा परिषद मैदान कळमनुरी ते रामचंद्र सात महाराज मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. "संत सेवालाल महाराज की जय","रामराव बापू महाराज की जय","शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो" अश्या घोषणांनी कळमनुरी शहर  दणाणून सोडले. 

सदर रॅली मंदिर परिसरात आल्यानंतर उपस्थित मान्यवर व महिला व पुरुष मंडळींनी जगदंबा माता व रामचंद्र सात महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेऊन  कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी महंत जितेंद्र महाराज, खा.डॉ.श्रीकांत शिंदे, पालकमंत्री तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खा.हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर व ऍड संतोष राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, शिंदे साहेब व फडणवीस साहेबांनी स्थापन केलेलं सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी रोज जनहिताचे निर्णय घेत आहेत. सर्व रेशनकार्ड धारकांसाठी 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देऊन सर्वांची दिवाळी गोड केली आहे. अतिवृष्टी मधील पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट स्वरूपात नुकसान भरपाई देणे चालू केले आहे. 

एव्हडेच नाहीतर बेरोजगार युवकांसाठी पोलीस भर्ती देखील सुरू केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल अडीच हजार कोटी रुपये नुकसान भरपाई टाकण्यात आली आहे. माननीय एकनाथ भाई शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सरकार स्थापन करण्याचा निर्णय हा योग्य होता म्हणून इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने इथे हा जनसमुदाय जमलेला आहे. आमचे सरकार हे फोटोसेशन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नसून, त्यांना प्रत्यक्ष कशी मदत भेटून त्यांच्या व्यथा कशा दूर करता येतील हे पाहत आहे. पूर्वीच्या सरकारने कोविडच्या नावाखाली आपली नामुष्की लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. घरातच बसून कारभार केला अशी टीकाही यावेळी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता केली. 

आमच्या सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून त्यांच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांसाठी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे आरोग्य अभियान प्रभावीपणे राबविले आहे. पूर्वीच्या सरकारने बंद केलेला मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करून अनेक गोरगरीब रुग्णांना त्याद्वारे मदत केली आहे. यावेळी माता-भगिनींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आमदार संतोष बांगर यांच्यावतीने आयोजित करीत असलेल्या भाऊबीज कार्यक्रमासाठी इतक्या प्रचंड संख्येने माता भगिनी जमतात. याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे आमदार संतोष बांगर हे सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस घेत असलेल्या मेहनतीमुळेच सर्वसामान्य जनता सुद्धा त्यांच्यावर एवढे भरभरून प्रेम करीत असल्याचे यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. शेवटी खासदार शिंदे म्हणाले की कळमनुरी येथील श्री रामचंद्र सात महाराज मंदिर विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर केला असून, यापुढेही मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात आमदार संतोष बांगर साहेब यांच्या कार्याचे कौतुक करून दरवर्षी संपन्न होणाऱ्या भाऊबीज या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की बंजारा समाज हा शब्दाला जागणारा समाज आहे. बंजारा समाजाच्या पाठिंब्यावर मी इथपर्यंत आलो आहे. कळमनुरी येथील रामचंद्र सात महाराज मंदिराच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर केला. त्यामुळे  या मंदिराचा विकास तर होणारच आहे तसेच कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांना प्रेरणा मिळावी म्हणून सर्व महामानवांचे पुतळे उभारणार असल्याचेही आमदार बांगर साहेब यांनी सांगितले. शिंदे सरकार म्हणजे सर्व सामान्य नागरिकांचे,कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून, मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी वर्षा या शासकीय निवासस्थानाची दारे सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास उघडी ठेवली आहेत. म्हणून हे सरकार जनतेचं सरकार आहे त्यामुळे राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी सतत कार्य करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व माता-भगिनी तसेच पुरुष मंडळीचे मनापासून आभार व्यक्त केले. 

उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर भाऊबीज कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी माता भगिनींनी खा श्रीकांत शिंदे, खा हेमंत पाटील, पालकमंत्री तथा कृषी मंत्री माननीय अब्दुल सत्तार, आ. बालाजी कल्याणकर, आ. संजय रायमुलकर, ऍड शिवाजीराव जाधव, बाबुराव कदम कोहळीकर, परभणी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, संजय बोंढारे पाटील, ऍड संतोष राठोड, खंडेराव आघाव, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम व कार्यक्रमाचे आयोजक माननीय आमदार संतोष बांगर साहेब यांना पारंपारिक पद्धतीने ओवाळून भाऊबीज साजरी केली. यावेळी आमदार संतोष बांगर साहेब व मान्यवरांतर्फे उपस्थित माता-भगिनींना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमांचा समारोप सर्वांच्या भोजनाने करण्यात आली होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंजारा समाज बांधवांनी व शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतली. यावेळी मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी