आधुनिक भारताचे शिल्पकार : पंडित जवाहरलाल नेहरू - NNL


"फुले आणि मुले" ही पंडित जवाहरलाल नेहरू यांना खुप आवडत असत.निसर्गाच्या सानिध्यात उगवलेली बागेतील गुलाबाची फुले खूप आवडत त्याचप्रमाणे उद्याची भावी पिढी म्हणजे मुले ही देवाघरची फुलेच आहे त्यामुळे त्यांच्याशी वर्तन सौहार्दाचे असायला हवे.त्यांना लहान मुले खूप आवडत असे म्हणून प्रेमाने मुले त्यांना "चाचा नेहरू" असे म्हणायचे.चाचा नेहरू यांचा जन्म मोतीलाल व स्वरूपाराणी या दाम्पत्याच्या पोटी श्रीमंत घराण्यात अलाहाबाद (प्रयागराज ) येथे १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यामधून झाले.वयाच्या पंधराव्या वर्षी  शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमध्ये हॅरो या ठिकाणी गेले.त्यानंतर केब्रीज विद्यापीठात सामान्य विज्ञानाची पदवी संपादन करून बॅरिस्टर ही पदवी देखील मिळविली. १९१२ ला भारतात परतल्यावर राजकारणाकडे वळले कारण त्यांचे वडील निष्णात वकील असल्याने त्यांचा देखील ओढा कायद्याच्या शिक्षणाकडे अधिक होता आणि भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने परतवून लावण्यासाठी पूर्णवेळ स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष,स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी योद्धे म्हणून नावारूपास आले.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या होमरुल चळवळीचे अलाहाबाद येथील ते अध्यक्ष बनले.१९१६ साली महात्मा गांधींची भेट आणि कमला कौल यांच्याशी विवाह त्याच वर्षी झाले त्यानंतर दुसऱ्याच वर्षी प्रियदर्शनी इंदिरा नावाची कन्यारत्न प्राप्त झाले.स्वातंत्र्य लढा उभारत असतांना महात्मा गांधींशी विचाराशी सहमत होऊन असहकार चळवळीशी बांधले गेले त्यामुळे त्यांना कारावास देखील भोगावा लागला.१९२३ ला चाचा नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन 'स्वराज्य' या पक्षाची स्थापना केली परंतू पाहिजे त्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही.भारतीय जनतेच्या गाऱ्हाणे ऐकून त्यावर उपाययोजना आखण्यासाठी लंडन वरून सायमन कमिशन भारतात आले होते पण भारतीयांनी तीव्र विरोध केला कारण त्यात एकही भारतीय सभासद नव्हता.सायमन कमिशन 'परत जा' अश्या घोषणा करतांना लाला लजपतराय सह पंडित जवाहरलाल नेहरूंना देखील लाठी हल्ला सहन करावा लागला.पुढील वर्षी १९२९ ला लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून पंडित नेहरूंची निवड करण्यात आली.त्यामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेला.त्याच दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आजही थाटामाटात साजरा करीत असतो.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू (१९३१) व पत्नी कमला नेहरू (१९३५) मध्ये सोडून गेले त्यामुळे पंडित नेहरू हे एकाकी पडले त्यांनी इंदिरा गांधीला अनेक पत्रे पाठविली.ती 'इंदिरेस पत्र' म्हणून पुस्तकरूपात आहेत.१९३५ साली उत्तराखंड मधील अलमोरा येथे कारागृहात असतांना आपले आत्मचरित्र लिहून काढले आणि पुढील वर्षी फैजपूर येथे (१९३६-३७) साली काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन भरले होते त्यात ते अध्यक्ष होते तसेच अखिल भारतीय कामगार संघटनेचे (AITUC) देखील अध्यक्ष बनल्यामुळे संघटित कामगारांचे देखील समस्या सोडविण्यासाठी मदत झाली.त्यावेळी वेगवेगळ्या देशाचे दौरे करून समस्या जाणून घेतल्या.दुसऱ्या महायुद्धात भारताला विचारात न घेता ब्रिटिशांनी भारताला युद्धाच्या खाईत लोटल्याने वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला.१९४२ साली गवालिया टॅंक मैदानावर महात्मा गांधींनी "करा किंवा मरा" हा नारा दिला तर पंडित नेहरू यांनी "भारत छोडो" ही क्रांतिकारी घोषणा केली.गर्भश्रीमंत घराण्यात जन्माला आल्यावर देखील नेहरूंनी संपत्तीचा व विदेशी वस्तूचा त्याग करून स्वदेशी वस्तूचा वापर केला.दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांचा पराभव, सत्ताबदल यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला.त्यावेळी फाळणीला विरोध होत असला तरी बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी अखेर नेहरुसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मान्य करावी लागली आणि १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीय लोकांच्या आनंदाचा,उत्साहाचा,चैतन्याचा ठरला कारण त्या दिवशी संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते.

भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पंडित नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला.२ वर्ष ११ महिने व १८ दिवस सर्व संविधान सभेच्या सदस्यांनी चर्चा विमर्ष करून संविधान तयार केले. संविधानाची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे.स्वातंत्र्य,समता,बंधुता यांची जोपासना करणारा भारत निर्माण करणे हे पंडितजींचे स्वप्न होते.डॉ.राजेंद्र प्रसाद घटनात्मक प्रमुख असतांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे बघितल्या जाते.भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बेकारी,दारिद्र्य, उपासमार,गुलामगिरी,जातीभेद,वंशभेद,प्रादेशिक भाषा वाद यासारख्या अनेक समस्या आवासून उभ्या होत्या. साम्राज्य वाढविण्यासाठी इतर देशांनी आक्रमण करू नये यासाठी पंडित नेहरू यांनी १९५४ साली पंचशील तत्वाचा पुरस्कार केला.चीनचे चो.एन.लाय व पंडित नेहरू यांनी पंचशील मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करण्याचे ठरविले त्यात परस्पर देशांनी सन्मानाने व्यवहार करावा,परस्परांवर आक्रमण करू नये, अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करू नये,राष्ट्रीय समानता व परस्परांचे हित जोपासणे व शांततामय सहजीवन जगणे तसेच एकमेकांना आर्थिक सहकार्य करणे इत्यादी तत्वे ठरवून दिली होती तरी देखील १९६२ साली चीनने आक्रमण करून पंचशील तत्वाचे पालन केले नाही व असलेली अपेक्षा फोल ठरली.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील दारिद्र्य संपवून जनतेला समृद्ध जीवन जगता यावे यासाठी समाजवाद स्वीकारला गेला.पंडित नेहरू यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" या मूळ इंग्रजी पुस्तकातून केवळ भारताचा इतिहास नाही तर  भारतीय जीवनाविषयीचे चिंतन व ऐतिहासिक घटना विषयीचे स्वतंत्र भाष्य केले आहे.त्याचे मराठी अनुवाद सानेगुरुजी यांनी "भारताचा शोध" या नावाने केला आहे.पंडित नेहरू हे निष्णात राजकारणीसह स्वतःचे वलय निर्माण करणारे आशावादी व्यक्तिमत्व होते हे त्यांच्या विविध धोरणातून दिसून येते.तत्कालीन काळातील विविध धोरणाची दूरदृष्टी दिसून येत होती. देशातील वंशवाद,साम्राज्यवादाला विरोध दर्शवून जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अलिप्तवादी धोरणाचा अवलंब करावा हे सर्वाना सांगितले त्यामुळे त्यांना "आधुनिक भारताचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते.जगात शांतता नांदावी यासाठी त्यांना "शांतिदुत" असे देखील म्हटल्या जाते.१९५५ साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान करण्यात आला.त्यांच्या कार्याला व प्रतिमेला विनम्र अभिवादन!!!!

✒️ दुशांत बाबुराव निमकर, शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर,  मो.नं :९७६५५४८९४९

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी