अखेर कामाजीवाडी गावातील भूकंपाची भीती झाली दूर -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
देगलूर तालुक्‍यातील मौ. कामाजीवाडी आणि सभोवतालच्‍या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातुन आवाज आणि कंपने येत होते.  वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार  सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देगलूर सौम्‍या शर्मा यांनी विशेष उपक्रम राबविला. त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आपातकालीन परिस्थितीतून सुरक्षिततेचे प्रशिक्षण आणि क्षमतावर्धन कार्यक्रमाचे नुकतेच कामाजीवाडी येथे आयोजन केले.


याचबरोबर शास्‍त्रीय संशोधन करण्‍यासाठी जिल्‍हा वरिष्‍ठ भुवैज्ञानिक डॉ. बी.एन. संगेवार यांनी 17 ऑक्टोंबर रोजी गावाची प्रत्‍यक्ष पाहणी केली. 28ऑक्टोंबर रोजी सहाय्यक जिल्‍हाधिकारी सौम्‍या शर्मा, स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विदयापिठाचे वरीष्‍ठ सहयोगी प्राध्‍यापक डॉ. टि. विजय कुमार  व जिल्‍हा आपत्‍ती अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन ग्रामसभेच्‍या विशेष बैठकीत कामाजीवाडी येथील नागरीकांना विशेष मार्गदर्शन केले. 


या प्रशिक्षणात भूकंप आणि त्‍यापासुन बचाव, सुरक्षित व भूकंपविरोधी बांधकाम, घरगुती अपघाताने लागणाऱ्या अग्‍नीपासुन बचाव, सर्पदंश व त्‍याचे उपचार, वैदयकीय प्राथमिक उपचार, अवकाळी पावसात कोसळणाऱ्या विजा आणि त्‍यापासुन स्‍वत:चा बचाव, रस्‍त्‍यांचे अपघात इत्‍यादी अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्‍तीवर  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, डॉ. संदेश जाधव, जिल्‍हा परिषद वैदयकीय अधिकारी, नांदेड वाघाळा महानगरपालिकाचे अग्‍नीशमन अधिकारी शेख रईस पाशा हमिदोदिन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्‍यांच्‍या विविध शंकांचे निरसन केले.  

या प्रशिक्षणासाठी तहसीलदार राजाभाऊ कदम, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेचे पदाधिकारी व सदस्‍य, ग्राम आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीचे पदाधिकारी व सदस्‍य, कामाजीवाडी सभोवतालच्‍या परिसरातील विदयार्थी, नागरीक, औषधी विक्रेते, स्‍थानिक डॉक्‍टर, जेसीबी, पोकलेनधारकधारक, जिल्‍हा परिषद आरोग्‍य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी, विदयार्थी यांनी मोठया संख्‍येने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार मीठेवाड, तलाठी माधुरी गोविंदराव शिरसाठ, तलाठी केतेश्‍वर माधव कोंडलवार, कामाजीवाडीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य हनमंत दिगंबरराव बिरादार, नागरीक यांनी प्रशासनाला योगदान दिले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी