मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेवर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL


मुंबई|
मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका, आणि आरोग्य विभाग यांनी व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केल्याची माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मुंबई शहरातील गोवर प्रार्दुभावामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्याच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याठिकाणी त्यांनी महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढाव बैठकही घेतली. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपचारांबाबत आणि अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण न झाल्यामुळे बालकांमध्ये प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. याबाबत महापालिकेची आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने तातडीची उपाययोजना म्हणून एका मोहिमेत सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केले आहे. लसीकरणापासून दूर राहिलेल्या बालकांना लस देण्याबाबत संबंधित सर्वच क्षेत्रात जाणीव जागृती करण्यात येत आहे. तेथील लोकप्रतिनिधींपासून महत्वाच्या आणि प्रमुख अशा व्यक्तींशी संपर्क साधण्यात येत आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे बालकांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी म्हणून जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. 

बालकांना चांगले उपचार मिळावेत यासाठीही निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व परिस्थितीवर आरोग्य विभाग आणि महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी सतर्कपणे आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही दिल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पर्यटन तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा प्रादुर्भाव जास्त आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घ्यावी. लसीकरणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी स्थानिक नेते, विविध धर्मगुरू यांची मदत घ्यावी. गोवरची साथ नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत १६४ बालकांना गोवरची लागण झाली असून त्यातील ६१ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लसीकरणासाठी  ९०० हून अधिक केंद्र सुरू करण्यात आले असून लसीकरणाच्या समन्वयासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच बालकांना ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा (डोस) देण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी