ग्रामस्वच्छता अभियान आता नव्या स्वरूपात ;अभियानाची एक महिना जनजागृती -NNL


नांदेड,अनिल मादसवार|
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुधारणे व त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य व केंद्र शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा नव्या स्वरूपात राबवण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्यात महिनाभर जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ग्रामस्वच्छता अभियान सन 2022-23 अंतर्गत 3 ते 19 नोव्हेंबर दरम्यान जिल्‍हयात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. गावागावात स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आपले गाव कायम हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी तसेच ग्राम स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी आणि वैयक्तिक शौचालयाचा वापर होण्यासाठी प्रत्येक गावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व्यापक स्वरूपामध्ये राबविण्यात यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विभागाचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकेल व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 6 लाखाचे बक्षीस-


जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या गटाला 60 हजार रुपये तर जिल्हास्तरावरील प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस 6 लाख, व्दितीय क्रमांकासाठी 4 लाख तर तृतीय पुरस्कार 3 लाख रुपयांचा आहे. विभाग स्तरावर प्रथम व्दितीय आणि तृतीय आलेल्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे 12 लाख, 9 लाख व 7 लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावर प्रथम बक्षीस 50 लाख रुपये आहे. व्दितीय बक्षीस 35 लाख व तृतीय बक्षीस 30 लाख रुपये देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत.

हे झाले नवीन बदल -

ग्रामपंचायतीच्या एकूण वार्ड मधून एक उत्कृष्ट वार्ड निवडून त्या वार्डाला दहा हजार रुपये पुरस्कार म्हणून दिल्‍या जात होते परंतु नवीन शासन निर्णयानुसार वार्डाला पुरस्कार देण्याची ही पद्धत बंद करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद गटांमधून प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला पूर्वी 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येत होते आता नवीन शासन निर्णय नुसार 60 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या अगोदर जिल्हास्तरावर प्रथम 5 लाख, व्दितीय 3 लाख आणि तृतीय 2 लाख रुपये प्रमाणे पारितोषिक दिल्या जात होते. नवीन शासन निर्णयानुसार वरील तिन्ही पुरस्कारामध्ये प्रत्येकी एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी