हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL


मुंबई|
''सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहित होण्यासाठी हरित ऊर्जा वापरावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच अमेरिके सारख्या देशाने महाराष्ट्रात हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी '', असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांच्या सदिच्छा भेटीवेळी केले.

 माईक हँकी यांनी अमेरिका - महाराष्ट्र द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी भेट घेवून माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शहरे, गावे आणि तालुके सार्वजनिक वाहतूकीने जोडलेले आहेत. ही वाहतूक व्यवस्था प्रदूषण विरहित करुन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी येत्या काळात राज्यात हरित ऊर्जा वापरावर भर देऊन हरित ऊर्जा उद्योगवाढीला चालना देण्यात येणार आहे. अमेरिकेने यासाठी पुढाकार घेऊन राज्यात या क्षेत्रात तसेच कौशल्य आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र हरित ऊर्जा वापरावर भर देत असल्याचे उदाहरण सांगताना उपमुख्यमंत्री यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ई- बसेस सुरु केल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचामृत संकल्पनेअंतर्गत देशात 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपययोजनांवर भर दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाला हरित ऊर्जेच्यादृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्र पावले उचलत असून, यासाठी अमेरिकेसारख्या देशांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासन आवश्यक सुविधांसह सर्व सहकार्य करण्यावर भर देत आहे. भारत आणि अमेरिका यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असून, येणाऱ्या काळात अमेरिकेतून महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यासाठी पोषक वातारण तयार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने कौशल्य विद्यापीठ राज्यात स्थापन केले असून, या विद्यापीठाअंतर्गत कौशल्य आधारित उद्योगांचे जाळे वाढविण्याच्या दृष्टीने अमेरिकन कंपन्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी बोलताना माईक हँकी यांनी म्हटले की, महाराष्ट्रात राहणे त्यांना आवडत असून गेल्या काही काळात त्यांनी राज्याच्या विविध भागांना भेटी दिल्या आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, कृषी, हरित ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांत अमेरिकन उद्योजक आपला व्यवसाय करत असून येणाऱ्या काळात अमेरिकेतील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याही श्री.माईक हँकी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबईचे वाणिज्यदूत यांचे राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, अमेरिकेच्या मुंबई वाणिज्यदूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया - नायक, डॉ. मनिष मल्के उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी  - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


"स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी", असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले.

स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रज्ञेश देसाई, डॉ. मनीष मल्के उपस्थित होते. ॲना लॅकवॉल यांनी स्वीडन देशामार्फत उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.

श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वीडन आणि भारताचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. आज अनेक स्वीडीश कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनने पुढाकार घ्यावा.स्वीडीश गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. श्रीमती लॅकवॉल म्हणाल्या की, येणाऱ्या काळात स्वीडीश आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद मुंबईत आयोजित करुन त्यांच्यात एक संवाद घडविण्यात यावा. स्वीडन देशसुध्दा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप आणि उद्योग सुरु करण्यासाठी स्वीडनचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला मिळेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी