देश जोडण्यासाठी पुसदचे दिव्यांग भारत जोडो यात्रेत सहभागी -NNL

राहुलजी हेच आमच्यासाठी गांधीजी- दिव्यांग प्रवीण कठाळे


कळमनुरी/हिंगोली।
 आम्ही बघू शकत नाही पण जाणून घेऊ शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो. आम्ही गांधीजी, विनोबा भावे  पाहिलेले नाहीत पण राहुलजींना पाहू शकतो. आमच्यासाठी ते गांधीजींच आहेत. भारत जोडो यात्रा देशाला एकसंघ करणारी आहे. म्हणूनच आम्ही पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आलो आहोत," असे दिव्यांग प्रवीण कठाळे सांगत होते.

पुसदच्या राष्ट्रीय दिव्यांग संघाचे प्रवीण कठाळे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आणखी दहा अंध दिव्यांगांची फौज होती. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून ते साखळी करून रस्त्याच्या कडेने पदयात्रेच्या दिशेने जात होते. त्यांचे नेतृत्व संघाचे अध्यक्ष सदानंद तायडे करत होते.


"आपल्या देशात द्वेष पसरवला जात आहे. समाजात फूट पाडत आहेत. त्याविरुद्ध राहुल गांधी लढत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्हाला व्यक्तिगत काहीही नको, असे ते निरागसपणे सांगत होते.

भारत जोडो यात्रेच्या सहाव्या दिवशी शनिवारी, औरंगाबाद येथून आलेल्या जानकी ग्रुपने अत्यंत सुंदर नृत्याविष्कार सादर करत मंगळागौरी साजऱ्या केल्या. पारंपरिक नऊवारी साडीत सजून दहा जणींच्या या पथकाने झिम्मा, फुगडी, घागर, करवंट्या, सूप, लाटणी नृत्य सादर केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील हलगीसम्राट निलेश मोरे यांनी यात्रेत हलगीचा ताल धरला होता आणि त्यावर काही यात्रेकरूंनी ठेका धरला होता. एका ठिकाणी मुरक्याचीवाडी येथील दंडारत संच आंध आदिवासी संस्थेच्या वतीने प्रबोधनपर आदिवासी नृत्य सादर केले.

कळमनुरीत शेकडो बंजारा महिला आणि पुरुष आपल्या विविध मागण्या घेवून राहुल गांधींना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आल्या होत्या. इंदिरा गांधीपासून आमचे मत काँग्रेसलाच आहे. फक्त आमच्या समाजाला ओळख मिळावी एवढीच मागणी आहे, असे अनिताबाई राठोड सांगत होत्या. कळमनुरीचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी