राज्यात दोन लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL


मुंबई|
मुंबईसह राज्यात दोन लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात केले.

सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका मीनाताई खडीकर, अभिनेत्री हेमा मालिनी, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेता अनुपम खेर, सोनू सूद, सिद्धार्थ मल्होत्रा आदी मान्यवरांसह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अमृता फडणवीस यांना सोसायटी अचिव्हर्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम सोसायटी मासिक गेली अनेक दशके करीत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून लाखो वाचकांना प्रेरणा देण्याचा सोसायटी मासिकाचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई आणि राज्याचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्व मिळून मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सर्वोत्तम बनवूया. विविध क्षेत्रात राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा आज गौरव झाला आहे. सोसायटी मासिकाने सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार सुरू केल्यास तो घ्यायला आम्ही नक्की येऊ, असेही ते म्हणाले.यावेळी मॅग्ना प्रकाशन समूहाचे अध्यक्ष नारी हिरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी