नागरिकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करायचा ठरवलं तर नक्कीच विकास घडून येतो - वर्षा ठाकूर-घुगे -NNL


नांदेड।
विविध जाती, धर्म, पंथ असलेल्या सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गावाचा विकास करायचा ठरवलं तर नक्कीच विकास घडून येतो आणि असाच मनोज्ञ संगम मला या पिंपळगाव या गावात दिसून आला. गाव एकोप्याने नांदत आहे हा मोठा संदेश आहे. असाच एकजुटीतून गावाचा विकास साधेल, असे मत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज ग्रामस्थांशी संवाद करताना व्यक्त केले.


हादगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे आज त्यांनी माझं गाव सुंदर गाव व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान या अंतर्गत या गावास भेट दिली. गावात  जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी  त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बँड, स्काऊट गाईड आणि लेझीम पथकाने संचालन करीत त्यांना वाजत गाजत गावात नेले. गावात दुतर्फा महिला आणि नागरिक थांबलेले होते. सर्व गाव स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके होते. गावातील अनेक घरे एकाच रंगाने रंगवलेली आढळली. प्रत्येक घराला महिलेचे नाव दिलेले दिसले. 
    

त्यांनी प्रारंभी शाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली. शाळेतील गुणवत्तापूर्ण विद्यार्थी, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण आणि मानांकित विद्यार्थ्यांचे त्यांनी या ठिकाणी अभिनंदन केले. बिटचे विस्ताराधिकारी सूर्यकांत बाच्छे, केंद्रप्रमुख नीलमवार, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. येथील मंदिरात झालेल्या ग्रामस्थांशी संवाद या कार्यक्रमात त्यांनी महिलांना बोलके केले. या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या या बाबीचे वर्षा ठाकूर घुगे यांनी कौतुक केले.
 

यावेळी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज,  जिल्हा पाणी व स्वच्छता उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, गट विकास अधिकारी उमेश मुदखेडे, गावच्या सरपंच कांतुलाबाई आडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे,  सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, सेवा समर्पणचे विठ्ठल फुलारी, शुभम तेलेवार यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय करपे यांनी तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी प्रदीप सोनटक्के यांनी केले. 
    

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी हादगाव तालुक्याच्या दौऱ्यात तामसा येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. तसेच शिवपुरी येथील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन नियोजनेत लाभ देण्यात आलेले लाभार्थी यादवराव लालबा मनपूर्वे यांच्या सिंचन विहिरीचे जलपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी