वादग्रस्त विधाने आणि सामाजिक अस्वस्थता -NNL


समाजात अस्वस्थता पसरविण्याचे काम सतत होत राहते ते केवळ वायफळ बडबड करीत राहिल्यामुळे. सर्वसामान्य लोकांच्या काही एक अर्थहीन बोलण्याला काहीही अर्थ नसतो तरी त्यांच्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नाही. परंतु एखादी बाब सार्वजनिक होते आणि सामाजिक धार्मिक आदी प्रकारांनी भावना दुखावल्या गेल्याचे लक्षात येताच या विषयावर गदारोळ उठतो. एखाद्या महापुरुषांच्या बाबतीत कुणी काही वादग्रस्त वक्तव्य केले तर मोठा उठाव होतो. मोर्चे निघतात. आंदोलने होतात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. मग मुद्दा कोणताही असो, नेटकऱ्यांना एखादा संवेदनशील मुद्दाच हवा असतो. काही वेळा अनेकजणांना सोशल मीडियावर वादग्रस्त लेखन केल्यामुळे किंवा चित्र, व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे तुरुंगाची हवा खावी लागली आहे. अटक करण्याची मागणी केली जाईपर्यंत समाजात अस्वस्थता कायम राहते. काही समाजविघातक लोक सामाजिक अशांतता प्रस्थापित करण्याचेच काम करतात. यात सर्वसामान्य माणसेही सहभागी असू शकतात.

बहुतांश वेळा राजकीय नेते, मंत्रीच मोठ्या प्रमाणावर वादग्रस्त विधानांचे धनी असतात. ते ज्या वेळी बोलतात त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती सामान्य नसते. ते बोलतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काय चाललेले असते हे कळायला मार्ग नसतो. मग जेव्हा त्यांच्या विधानावरून मोठा गदारोळ उठतो तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण काहीतरी चुकीचे बोललो होतो. ही व्यक्ती राजकीय असेल तर पक्षांतर्गत खळबळ माजते. 

तेव्हा काहीतरी सारवासारव केली जाते. त्यांना/मला तसे म्हणायचे नव्हते किंवा माझ्या/त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला किंवा त्यांचे ते वैयक्तिक विधान आहे, त्यांच्या वक्तव्याचा पक्षाच्या/ संघटनेच्या भूमिकेशी, ध्येयधोरणाशी, वैचारिकतेशी काहीही संबंध नाही अशी सारवासारव केली जाते. वादावर पडदा टाकण्याचा पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. लोकंही विसरु शकत नाहीत कारण माध्ममे  'सवाल पे बवाल' किंवा 'बात का बत्तंगड' वगैरे चोवीस तास चर्चासत्रे सुरुच राहतात. विरोधक रस्त्यावर उतरतात. ती व्यक्ती संवैधानिक पदावर कार्यरत असेल तर राजीनाम्याची मागणी केली जाते. एवढे होऊनही काही वेळा पाठीशी घालण्याचेही प्रकार घडतात.

बेताल वक्तव्ये करण्यात काही सर्वधर्मीय संत महंतांचा दुसरा नंबर लागतो. ही मंडळी स्वधार्मिक अस्मितेच्या मुद्यावर बोलत राहतात. हे सुध्दा सोशल मीडियावर ट्रोल होतात. त्यांचे अंधभक्त आणि विरोधक आमनेसामने येतात. जातीय, धार्मिक, सांस्कृतिक परंपरांच्या विरोधात वक्तव्य असल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जाते. आपल्या देशात जात, पोटजात, धर्म, पंथ, संप्रदाय वगैरे वगैरे मानवसमुह पिढ्यानपिढ्या आपापल्या अस्मिता कुरवाळत बसतात, अशी परिस्थिती आहे. 

हरेक जातसमुहांनी आपापले महापुरुष जन्माला घातले आहेत. झेंडे घेऊन इतिहासाच्या छाताडावर नाचत आहेत.  कुठे काही घडले की यामुळे दंगल किंवा दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. लोकांचे समुह एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. प्रशासनावर अधिकचा ताण निर्माण होतो. समाजात अस्वस्थता निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातील अधिकारी प्रयत्नशील असतात. प्रकरण हाताबाहेर जाऊ लागले तर त्यांना विविध पर्याय तपासून पहावे लागतात. 

महिलांच्या बाबतीत अलिकडे अधिकच वादग्रस्त वक्तव्य होऊ लागले आहे. भिडे प्रकरण शमत नाही तोपर्यंत ना. सत्तारांचे पुढे आले आहे. कुणीही कुणाबाबतही बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी तर याचे प्रकर्षांने भान ठेवले पाहिजे. मग ती महिला असो की पुरुष. जातीय, धार्मिक अस्मितांना डिवचण्याचे काम कदापिही करु नये. समाजकंटक हे समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये स्थिरावलेले आढळतात. विशिष्ट कालावधीनंतर ते आपले डोके वर काढतात. या प्रकारातील बेताल वक्तव्ये करणाऱ्या लोकांचे मेंदू सतत तपासले पाहिजेत. हे लोक मानसिकदृष्ट्या कमजोर असतात. त्यांना विशिष्ट कालावधीनंतर समुपदेशनाची गरज असते. 

आपण कुठे आणि काय बोलतो आहोत याचेही काही अंशी भान बाळगले पाहिजे. आपल्या वक्तव्याचा निषेध होईल, आपल्या विरोधात आंदोलन होईल, निदर्शने होतील, पुतळा जाळला जाईल, अशांतता निर्माण होईल या परिणामांचा विचार बोलण्याआधी केला पाहिजे. बोलून विचारात पडण्याची किंवा माफी मागण्याची वेळ येऊ देऊ नये. परंतु वादग्रस्त वक्तव्य केले तरी काही फरक पडत नाही किंवा राजकीय लोकांचा स्थायीभाव बनत जातो. यामुळे इतरांचेही फावते. काही लोक वादग्रस्त वक्तव्य करुन सवंग प्रसिद्धी पावतात. सज्जन लोक मात्र व्यवस्थितपणे दुर्लक्ष करतात.

- प्रज्ञाधर ढवळे, नांदेड, मो. ९८९०२४७९५३.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी