संध्याकाळचा स्थानिक रेडिओ पुन्हा सुरु करण्यासाठी संसदेत आवाज उठवणार - खासदार हेमंत पाटील -NNL


नांदेड।
गेल्या १ जुलैपासून बंद करण्यात आलेले नांदेडसह सर्वच स्थानिक रेडिओचे सायंकाळचे प्रसारण पुन्हा सुरू करण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन नांदेडचे भूमीपुत्र तथा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दिले आहे. 

शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी आकाशवाणी प्रासंगीक उद्घोषक संकलक संघटनेच्या शिष्टमंडळाने खासदार हेमंत पाटील यांना निवेदन दिले.  यावेळी संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, बाबुराव पाटील कोहळीकर, जिल्हा प्रमुख आनंद बोंढारकर, भाजपचे महानगर प्रमुख प्रवीण साले, गोजेगावकर, अजय देशमुख सरसमकर, प्रा. सुरेश कटकमवार, अँड. रविंद्र रगटे, विजय शिरमेवार यांची उपस्थिती होती.

गोवा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यामध्ये रेडिओचे स्थानिक संध्याकाळचे प्रसारण गेल्या १ जुलै २०२२ पासून बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी प्रसार भारतीने मुंबई, पुणे, नागपूर यासह त्या राज्यातील मोठया केंद्रांवरून कार्यक्रम सहक्षेपीत (रिले) करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्हयासह आंध्र, तेलंगणापर्यंत विखुरलेले आकाशवाणीचे श्रोते कमालीचे नाराज झाले आहेत. स्वतःच्या जिल्हा आणि परिसरातील स्थानिक कलाकारांना रेडिओवर ऐकणे, कलागुणांना वाव देणे, आपली संस्कृती जतन करणे, स्थानिक घटना, नैसर्गिक आपत्ती, हवामानाचा अंदाज यासह घटना घडामोडींबाबत दिल्या जाणाऱ्या मौलीक सूचना रेडियोवरून ऐकणे श्रेत्यांना दुरापास्त झाले आहे.  

स्थानिक कार्यक्रमांची निर्मितीच थांबल्यामुळे रेडिओच्या कार्यक्रमांचा आनंद घेणाऱ्या श्रोत्यांचा हिरमोड तर झालाच आहे. शिवाय गेल्या २० ते २५ वर्षांपासून आकाशवाणीत कार्यरत असणाऱ्या आकस्मीक उद्घोषक, संकलक यांचेही काम जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. या आकस्मीक कर्मचाऱ्यांवरच संपूर्ण केंद्र चालत असतानाच त्यांच्यावरच बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.  तसेच प्रसार भारतीच्या या "रिले" धोरणामुळे आकाशवाणी नांदेडसह तीनही राज्यात लोकप्रियता कमी आहे आणि जाहिरातिच्या माध्यमातून मिळणारा महसूलही मोठया प्रमाणात बुडत आहे. खरंतर, हा निर्णय घेणाऱ्या प्रसार भारतीवरही हे मोठे आर्थिक संकट आहे.

स्थानिक रेडिओ केंद्राचे दुपारचे आणि सायंकालिन प्रसारण तात्काळ सुरू करावे, अशी मागणी, संघटनेच्यावतीने खासदार हेमंत पाटील यांच्याकडे केली आहे. दरम्यान, करमणुकीबरोबरच लोक प्रबोधनाचे कामही रेडिओवरून केले जाते. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचं रेडिओ, आजही एक प्रभावी माध्यम आहे. जनतेच्या, श्रोत्यांच्या जिव्हाळयाचा हा रेडिओ बंद पडू देणार नाही. केंद्रिय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी याबाबत तात्काळ संपर्क साधून पाठपुरावा करू. इतकेच नाही तर संसदेतही याबाबत प्रश्न उपस्थित करू, असे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी दिले आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शेख हसीना, सहसचिव आनंद गोडबोले, कोषाध्यक्ष आनंद पंडित, संघटक संचिता केळकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी